Home प्रशासन कानपूर येथे दाखल एफआयआरचा सावदा मुस्लिम समाजातर्फे निषेध 

कानपूर येथे दाखल एफआयआरचा सावदा मुस्लिम समाजातर्फे निषेध 

0
237

सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  उत्तर प्रदेशातील कानपूर येथे केवळ “I love Muhammad” असे लिहिल्यामुळे २५ मुस्लिम तरुणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्याने सावदा मुस्लिम समाजाने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. हा प्रकार भारतीय संविधानातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि धार्मिक स्वातंत्र्यावर होणारा स्पष्ट आघात असल्याचे सांगत, राष्ट्रपती व पंतप्रधानांनी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर शुक्रवारी, १९ सप्टेंबर रोजी सावदा पोलीस ठाण्यात समाजाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये समाजाने स्पष्ट केले की “I love Muhammad” असे लिहिणे हे कोणत्याही प्रकारे धार्मिक तेढ पसरवणारे नसून, प्रेम, श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक आहे. त्यामुळे अशी कृती गुन्हा ठरवणे ही केवळ संविधानिक नव्हे, तर लोकशाही मूल्यांविरोधी असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

या प्रसंगी शेखपुरा मुस्लिम पंचाचे सचिव शेख मुख्तार शेख अरमान यांनी सांगितले की, या प्रकरणाकडे केवळ कायद्याच्या चौकटीत न पाहता मानवी हक्क आणि धार्मिक सहिष्णुतेच्या दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे.

या निवेदनप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष ढवळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांना समाजाच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. या वेळी मोहम्मद उमेर खान, शेख अरबाज, अबु दानिश, दानिश खान, आबिद शेख नजीर, मकसूद खान, मुस्तफा खान यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक आणि मुस्लिम समाजातील मान्यवर उपस्थित होते. यामध्ये हाजी जाविद कारी, शेख राजा शेख सादीक, शेख निसार शेख नबी, शेख इरफान शेख लुकमान, शेख आबिद शेख मजीद, मोईन लाला, शेख अजहर शेख कमील, तसेच माजी नगरसेवक फिरोज खान पठाण यांचाही सहभाग होता.


Protected Content

Play sound