स्त्री शिक्षणातून परिवर्तनाचा पाया रचणाऱ्या सवित्रीबाई फुले खऱ्या आदर्श – उपप्राचार्य डॉ. कल्पना पाटील

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय समाज स्पृश्य-अस्पृश्य व जाचक रूढी वादाने ग्रासलेला होता. अशा अत्यंत प्रतिकूल वातावरणात स्त्रीमुक्तीचा मार्ग स्त्री शिक्षणातूनच आहे हे जाणून अनन्वित शारीरिक व मानसिक त्रास व अत्याचार सहन करूनही व्यापक शिक्षणाची चळवळ उभी करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्याच समाजासमोर खऱ्या आदर्श असल्याचे गौरवोद्गार धनाजी नाना महाविद्यालयाच्या उपप्राचार्य तथा हिंदी विषयाच्या विभाग प्रमुख प्रा डॉ कल्पना पाटील यांनी काढलेत. ते तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सण व उत्सव समितीच्या वतीने आयोजित सावित्रीबाई फुले जयंतीच्या अभिवादन सभेत बोलत होत्या. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वाघुळदे यांच्यासहित उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सण उत्सव समितीचे चेअरमन प्रा डॉ दीपक सूर्यवंशी यांनी केले. त्यात सावित्रीबाई फुले यांचे जीवन चरित्र, शिक्षण विषयक त्यांचे कार्य व समाज प्रबोधनाचे विचार यावर विवेचन केले. यानंतर प्रा डॉ कल्पना पाटील यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला उजाळा देत उपस्थितांसमोर सावित्रीबाई चे कार्य सविस्तर मांडले. सद्य परिस्थितीत लोकांची मानसिकता अति संकुचित होत असून स्वातंत्र्यपूर्व काळात प्रसंगी शारीरिक व मानसिक त्रास होत असतानाही निस्वार्थ हेतूने शिक्षणाची ज्ञानगंगा गोरगरीब, वंचितांसाठी आणणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हेच खरे आदर्श असल्याचे मनोगत व्यक्त करीत प्रत्येकाने त्यांच्या कार्य समजून घेवुन समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र वाघुळदे यांच्या शुभहस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यारपन करण्यात आले. यानंतर उपस्थितांनी पुष्प अर्पण करीत सावित्रीबाई फुले यांना नम्र आदरांजली वाहिली. यावेळी उपस्थित विद्यार्थिनींनी सावित्रीबाईंचे जीवन कार्य समजावून घेत महाविद्यालयातील व समाजातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांचे व्यक्ती चरित्र व स्त्री शिक्षणाविषयीचे कार्य पोहोचवू अशी प्रतिज्ञा केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तापी परिसर विद्या मंडळाचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मार्गदर्शक व सहकार्य करत आहेत.

Protected Content