जळगाव, प्रतिनिधी | अनुसूचित जाती, जमातीच्या भटक्या आणि विमुक्त जातीतील व ग्रामिण भागातील आर्थिकदृष्ट्या मागास मुलींना शासनातर्फे सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेंतर्गत प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते. यावर्षी या समितीची बैठक शिक्षण सभापती पोपट तात्या भोळे यांच्या उपस्थित घेण्यात आली.
सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना समितीच्या बैठकीत जिल्ह्यात या योजनेंतर्गत ७ लाख ६० हजाराचा प्रोत्साहनपर अनुदान लवकरच वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. शासनाची ही आर्थिकदृष्ट्या मागास मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना आहे. या योजनेसाठी कुणीही स्वइच्छेने निधी देऊ शकतात. जिल्ह्याभरातील १५ तालुक्यातील शाळांमधील शिक्षकांनी स्वत:हून या याजेनेसाठी देणगी दिल्या आहेत. त्यामाध्यमातून १ कोटी ९६ हजार एवढ्या रकमेची जिल्हा बँकेत एक वर्षांच्या मुदत ठेवीने ही रक्कम ठेवण्यात येते. त्यातून मिळणार्या व्याजाच्या रकमेतून प्रत्येक वर्गातील पहिलीच्या एका मुलीला ३६० रुपयाचे अनुदान देण्यात येणार आहे. समितीच्या बैठकीत अनुदान वाटपाबाबत सकारात्मक चर्चा होऊन जिल्ह्यातील २११० शाळांना ३ जानेवारीर्यंत हे अनुदान वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिक्षण समिती सभापती पोपटतात्या भोळे यांनी सामाजिक दृष्टीकोनातून व आर्थिक मागास मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी या समितीकडे ११ हजाराच्या देणगीचा धनादेश सुपूर्त केला. बैठकीला उपशिक्षणाधिकारी एस.एस.चौधरी, माध्यमिक उप शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, समिती सदस्य विजय पवार, ज्ञानेश्वर सोनवणे, प्रभाकर महाजन, पंढरीनाथ पाटील, पंकजा पटेल, अरूणा महाले आदी उपस्थित होते. जिल्हाभरातील लाभार्थी मुलींची संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. यात अमळनेर तालुका १४० लाभार्थी , भडगाव १४० ,भुसावळ १३० , बोदवड १३०, चाळीसगाव १५० , चोपडा १६० , धरणगाव १३० ,एरंडोल १३० , जळगाव १४० ,जामनेर १५० , मुक्ताईनगर १३० ,पाचोरा १४० पारोळा १४०, रावेर १५० ,यावल १५० लाभार्थीचा समावेश आहे.