नांदेड प्रतिनिधी । गेल्या पंधरा दिवसात नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि शेतीची पाहणी करण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आज मराठवाडा दौऱ्यावर आहेत. येथील जानापुरी या ठिकाणी शेतावर जाऊन त्यांनी पाहणी केली. यावेळी “उद्धवसाहेब शेतकऱ्यांना जगवा” असे आवाहन शेतकऱ्यांनी केले.
नांदेडमध्ये आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी घास हिरावला गेला आहे. अशा स्थितीत बळीराजा हवालदिल झाला आहे. सोयाबीन, कापूस, तूर या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अशा सगळ्या परिस्थितीत उद्धव ठाकरे हे बळीराजाला दिलासा देण्यासाठी मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. सध्या राज्यात सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. तरीही राजकारणापेक्षा शेतकरी महत्त्वाचा आहे हे स्पष्ट करत उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा दौरा सुरु केला. आता या शेतकऱ्यांसाठी चारा छावण्या उभारा असे आदेश त्यांनी शिवसैनिकांना दिले आहेत.
जानापुरी लोहा या ठिकाणी जाऊन उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे आपल्या समस्या जाणून घेण्यासाठी आले हे पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. तुम्हीच आता काहीतरी करा आणि शेतकऱ्यांना वाचवा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. यावेळी उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या, त्यानंतर ते पुढील गावात दौऱ्यासाठी निघून गेले. आता रडायचं नाही तर लढायचं असंही उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना सांगितलं.