वाहतुकीच्या नियमांचे तंतोतंत पालन करून स्वत:सह सर्वांचा जीव वाचवा- प्रांताधिकारी बबनराव काकडे

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । प्रत्येकाचे जीवन अनमोल असून सद्यस्थितीत रस्ता अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी दुचाकी स्वारांनी हेल्मेटचा वापर करावा, चारचाकी वाहनधारकांनी सीट बेल्ट वापरावा, अल्पवयीन मुलांच्या हातात वाहने देऊ नये, वाहनधारकाकडे वाहन चालवण्याचा परवाना असावा, यासहित रात्रीचा प्रवास टाळून दारूच्या आहारी जाऊन वाहन चालवू नये, असा मोलाचा सल्ला प्रांताधिकारी बबनराव काकडे यांनी दिला.

ते तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना आणि इंटरनल क्वालिटी अशुरंस सेल (आयक्यूएसी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आयोजित रस्ता सुरक्षा अभियानाच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री केतन किरंगे, वाहतुकीची जबाबदारी सांभाळणारे श्री रुस्तम तडवी, श्री सलीम तडवी, राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत यांच्यासहित कॅडेट्स व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र वाघुळदे व 18 महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगावचे समादेशक अधिकारी कर्नल अभिजीत महाजन, प्रशासकीय अधिकारी कर्नल अश्विन वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली नववर्षाला सुरुवात होतानाच वाहतुकीच्या नियमांचे पालन सक्तीने व्हावे जेणेकरून अनैसर्गिक रस्ता अपघातांचे प्रमाण कमी करता येईल या उद्देशाने फैजपूर येथील सुभाष चौकात दुचाकी स्वारांना हेल्मेट वापरण्याची विनंती तसेच चार चाकी वाहन धारकांना सीटबेल्ट लावूनच वाहन चालवावे अशा प्रकारची विनंती करण्यात आली व स्वतः वाहतुकीच्या नियमांचे तंतोतंत पालन करावेच मात्र परिवार व समाजातील प्रत्येक घटकाला याबाबतीत सतर्क व जागरूक करावे असे आवाहन करण्यात आले.

या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले असून वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करू असे आश्र्वासन दिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ओमसिंग राजपूत, वीरेंद्र जैन, रोहित महाजन, यश कोळी, यशवंत कोळी, रेहान सैय्यद, निलेश पाटील, विशाल श्रीखंडे, दीपक कोल्हे यांनी परिश्रम घेतले.

Protected Content