Home क्राईम सावदा पोलिसांचा पोलीस अधिक्षकांकडून सन्मानपत्र देऊन गौरव

सावदा पोलिसांचा पोलीस अधिक्षकांकडून सन्मानपत्र देऊन गौरव


सावदा -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सावदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या जबरी चोरीच्या गंभीर गुन्ह्याचा तपास अवघ्या काही दिवसांत यशस्वीरीत्या पूर्ण करत सावदा पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून मोठी कामगिरी बजावली आहे. कोणतीही ठोस प्राथमिक माहिती नसताना केवळ गोपनीय बातमीच्या आधारे गुन्ह्याची उकल झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.

सावदा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 284/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 309(4) प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुभाष ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. तपासादरम्यान सुरुवातीला कोणतीही ठोस माहिती हाती नसतानाही पोलिसांनी तांत्रिक कौशल्य व गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा शोध सुरू ठेवला.

अखेर पोलिसांनी दोन आरोपी अब्बास इबाबत शेख इराणी आणि मोहम्मद अली उर्फ पद्दू काला अली इराणी यांना अटक केली. अटक केल्यानंतर त्यांच्या चौकशीतून गुन्ह्याची संपूर्ण माहिती उघडकीस आली. आरोपींकडून चोरीस गेलेला सुमारे 1 लाख 32 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल, त्यामध्ये 23 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत हस्तगत करण्यात आली असून जबरी चोरीचा गुन्हा पूर्णतः उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले.

याचबरोबर आरोपींकडून मलकापूर येथून चोरीस गेलेली एक मोटारसायकल देखील हस्तगत करण्यात आली. त्यामुळे मलकापूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेला चोरीचा आणखी एक गुन्हा उघडकीस आला असून दोन्ही पोलीस ठाण्यांना या तपासाचा मोठा फायदा झाला आहे. आरोपींनी विविध ठिकाणी केलेल्या चोरीच्या घटनांचा उलगडा होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.

या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत माननीय पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक  विशाल पाटील, पोलीस हवालदार संजीव एकनाथ चौधरी, निलेश बाविस्कर आणि मयूर पाटील यांचा सन्मानपत्र देऊन गौरव केला. त्यांच्या मेहनतीमुळे नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाविषयी विश्वास अधिक दृढ झाला आहे.

एकूणच सावदा पोलिसांनी कमी वेळेत जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणत आरोपींना जेरबंद केले असून मुद्देमाल व वाहन हस्तगत करून कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. या कारवाईमुळे परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीला मोठा आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound