सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । पालमार्गे इंदूर या नव्याने तयार होत असलेल्या महामार्गाला दिवंगत हरीभाऊ जावळे यांचे नाव देण्याची मागणी नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत केली आहे.
याबाबत वृत्त असे की, गुरूवारी येथील पालीकेची सर्वसाधारण सभा व्हिडीओ कॉन्फरन्सींच्या माध्यमातून पार पडली. यात विविध विषयांवर चर्चा होऊन मंजुरी देण्यात आली. यात सध्या पालमार्गे इंदूर येथे जाण्यासाठी महामार्ग तयार करण्यात येत आहे. या महामार्गासाठी तत्कालीन आमदार तथा माजी खासदार हरीभाऊ जावळे यांनी विशेष प्रयत्न केले होते. आज तेे आपल्यात नाहीत. मात्र त्यांच्या स्मृती म्हणून या महामार्गाला स्व.हरिभाऊ जावळे महामार्ग असे नाव देण्यात यावे अशी मागणी नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी केली.
दरम्यान, या बैठकीत घनकचरा प्रकल्पाच्या जागेत संरक्षक भिंत उभारणे व शहर विकास योजनेंतर्गत दुकान केंद्राच्या इमारतीवर पहिल्या मजल्याचे बांधकाम करणे हे दोन विषय तहकूब ठेवण्यात आले. उर्वरीत १२ विषयांना मंजुरी देण्यात आली.