ठाणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महापालिकेचे प्रथम नगराध्यक्ष, प्रथम महापौर आणि शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांचे रविवारी ठाण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ठाणे शहराच्या विकासात तसेच शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीत प्रधान यांनी मोठे योगदान दिले होते. त्यांच्या निधनामुळे सर्वच क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.
ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष म्हणून १९७४-८१ याकालावधीत सतीश प्रधान यांनी काम पाहिले. शहरात शिवसेना पक्षाचा पाया रोवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. १९८६-८७ या काळात त्यांनी शहराचे पहिले महापौर पद भूषविले. यासह शिवसेनेचे राज्यसभा सदस्य, संसदीय गटनेते आणि केंद्रातील विविध समित्यांवर त्यांनी काम केले. राजकारणासोबतच सतीश प्रधान यांनी क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेले कार्यही उल्लेखनीय आहे. त्या काळामध्ये कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळत नव्हता, म्हणून ज्ञानसाधना महाविद्यालय त्यांनी सुरू केले. शहराच्या सांस्कृतिक सामाजिक जडणघडणीमध्ये त्यांचे योगदान लाभले आहे. दादोजी कोंडदेव स्टेडियम आणि राम गणेश गडकरी रंगायतन हे सुद्धा सतीश प्रधान यांच्या संकल्पनेतून साकार झाले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. त्यामुळे सक्रिय राजकारणापासून ते अलिप्त होते. रविवारी, दुपारी ठाण्याच्या खासगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी, सकाळी १० वाजता ठाण्यातील जवाहरबाग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. सतीश प्रधान यांच्या निधनामुळे राजकीय, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रात मोठी पोकळीक निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.