यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील न्हावी प्रगणे अडावद तालुका यावल या गावाच्या सरपंच मंजुषा सोळंके यांनी सामाजिक, शैक्षणिक व राजकीय या क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल त्यांचा जळगाव येथील राजनंदिनी बहुउदेशीय संस्थेच्या वतीने नारीरत्न या राज्यस्तरिय पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
राजनंदिनी बहुऊदेशीय संस्था, जळगावच्या वतीने आज रविवार, दि. ३१ जुलै रोजी जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनात संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष संदीपा वाघ यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडला.
याप्रसंगी “स्त्री म्हणजे बुद्धीने विचार केला तर कधी न समजणारं एक व्यक्तीमत्व, पण प्रेमाने विचार केला तर एक सरळ अस्तित्व अशा या आदीशक्ती, थोर समाज सेविका सावित्रीबाई फुले यांच्या विचाराला आत्मसात करून समाजकार्य करणाऱ्या लेकी मांगल्याचे प्रतिक असलेली एक स्त्रीशक्ती म्हणुन यावल तालुक्यातील एका छोटयाशा न्हावी प्रगणे अडावद या गावात सरपंचपदाची यशस्वी धुरा सांभाळणाऱ्या मंजुषा विकास सोळंके यांचा वर्ष २०२१ / २२ वर्षाकरीता राज्यस्तरिय नारीरत्न या पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.
सरपंच सोळंके या यावल पंचायत समिती माजी उपसभापती जनाबाई जगन सोळंके व कै. जगनभाऊ सोळंके यांच्या सून असून युवा सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य विकास उर्फ गोटू सोळंके यांच्या त्या पत्नी आहेत. त्यांना मिळालेल्या नारीरत्न पुरस्कारामुळे त्यांचा सर्वत्र स्वागत आणि अभिनंदन करण्यात येत आहे.