नवी दिल्ली वृत्तसंस्था । कथित लैंगिक शोषणाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना क्लिन चीट दिल्यानंतर गोगोईंविरोधात आज सर्वोच्च न्यायालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. याप्रकरणी ५५ निदर्शकांना ताब्यात घेण्यात आले आहे. या निदर्शनात महिला वकीलही मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. गोगोईंना क्लीन चिट देऊन अंतर्गत चौकशी समितीने पीडित महिलेवर अन्याय केल्याचं या निदर्शकांचे म्हणणे आहे.
चौकशी समितीने काल गोगोई यांना क्लीन चिट देताना सदर महिलेच्या आरोपात काहीच तथ्य नसल्याचे म्हटले होते. त्याचा निषेध म्हणून आज काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयाबाहेर निदर्शने केली. यावेळी आंदोलकांनी ‘नो क्लीन चिट’, ‘कायद्याचा आदर राखा’, ‘तुम्ही कायद्यापेक्षा मोठे नाहीत’, अशा घोषणा लिहिलेले बॅनर झळकावले. त्यात महिला वकील आणि सामाजिक कार्यकर्त्यांचाही सहभाग होता.
कोर्ट परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. निदर्शने करणाऱ्या ५२ महिलांसह तीन पुरुषांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे, असं पोलीस उपायुक्त मधूर वर्मा यांनी बोलतांना सांगितले.