चाळीसगाव प्रतिनिधी । आपले स्वारस्य पणाला लावणारे प्रसंग अन आव्हानं आजही स्त्री पुढे पेच घालत असतात. आपल्यातील गगनभरारी, इच्छेला व क्षमतेला तिलाच बांध घालावा लागतो. स्री जातीस समजून घेत चार पावलातले दोन पावले पुरुषवर्गही मागे आला तर खऱ्या अर्थाने स्त्री-पुरुष समानता हे तत्त्व प्रभावी ठरेल, असे प्रतिपादन साहस फाउंडेशनच्या संस्थापिका सरिता माळी यांनी व्यक्त केले.
लाडशाखीय वाणी समाज महिला मंडळाच्या वतीने शहरातील वाणी मंगल कार्यालयात ‘स्त्री चे नेमके स्थान कोणते?’ या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी लाडशाखीय वाणी समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा माधुरी वाणी, उपाध्यक्षा मीना कुडे, सहसचिव वैशाली येवले, जेष्ठ सदस्या वत्सला कोतकर, मालती पाटे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
स्त्री ही निसर्गतःच कोमल स्वभावाची, संवेदनशील मनाची आणि काळजीवाहू असते. त्यामुळेच ती स्वतःहून कौटुंबिक जबाबदाऱ्या जास्त स्विकारते. यात संस्कार, परंपरा, रुढी यामुळे तिचे विचार स्वातंत्र्य बऱ्यापैकी मर्यादित होत जाते. ती माघार घेणारी असते, हे तिच्यातील गुण तिच्यासाठीच मारक ठरतात. संसाराचा गाडा ओढतानाही बऱ्याचदा तिला नमते घ्यावे लागते. निसर्गाने स्त्रीवरच मातृत्वाची जबाबदारी दिली असल्याने ती अपत्य प्रेमाने आजही बांधली गेली आहे. मुलांचं संगोपन, लालन पालन तन्मयतेने करतांना मात्र ती एकटी पडली आहे. स्त्रियांचे पती अन मुलांसाठी मागे राहणे हा त्याग, मोठेपणा राहिला असून स्त्रियांच्या या त्यागाला खरोखर मोठे स्थान आहे. पुरुषवर्गाने दोन पाऊले मागे घेऊन तिच्या सोबतीने चालले तरच स्त्री-पुरुष समानता संविधानात अतिमहत्वाचे तत्त्व खरे होईल अन समाजाचा सर्वांगीण विकास होईल एवढेच नाही तर एक संपन्न, विकसित व उन्नत अशी समाजव्यवस्था निर्माण होईल, असे सरिता माळी यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मीना कुडे यांनी केले तर आभार डॉ.चेतना कोतकर यांनी मानले. याप्रसंगी इंदुबाई भोकरे, मालती वरखेडे, कल्पना पाखले, रजनी मोराणकर, सुलभा अमृतकर, कल्पना राणे, अंजली येवले, आशालता पिंगळे, वैशाली अमृतकर, वर्षा शिरुडे, वर्षा पिंगळे,आशालता येवले, मनीषा मालपुरे, डॉ. भाग्यश्री शिनकर, रुचा अमृतकार, संगीता येवले, भारती दुसे आदी महिला उपस्थित होत्या.