Home पर्यावरण पर्यावरणपूरक उपक्रमाने संतोष शेलोडे यांनी दिला प्रेरणादायक संदेश

पर्यावरणपूरक उपक्रमाने संतोष शेलोडे यांनी दिला प्रेरणादायक संदेश


भुसावळ – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  भुसावळ शहरात एक सकारात्मक आणि पर्यावरणपूरक संदेश देणाऱ्या उपक्रमास नुकतीच सुरुवात झाली. मराठी पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष आणि *‘खान्देश लाईव्ह न्यूज’*चे संपादक संतोष शेलोडे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त पारंपरिक जल्लोष न करता, वृक्षारोपण करत निसर्गाशी आपले नाते दृढ करण्याचा संकल्प केला.

या उपक्रमाचा शुभारंभ सानेगुरुजी स्मारकाजवळ प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. वाढत्या तापमानाचा आणि बदलत्या हवामानाचा विचार करता शासन वृक्ष लागवडीवर भर देत असून, संतोष शेलोडे यांनी या मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग घेतल्याने नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण झाली आहे. झाडांची संख्या घटल्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होणे, ऑक्सिजनच्या प्रमाणात घट येणे, विषारी वायूंचे वाढते प्रमाण – या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करत त्यांनी वृक्ष लावण्याचेच नव्हे तर झाडाचे संगोपन करण्याचेही जबाबदारीपूर्वक पालकत्व स्वीकारले आहे.

शेलोडे यांनी वृक्षारोपणानंतर त्या झाडासाठी ट्री गार्डही लावल्याचे सांगितले. हा केवळ एक फोटोसेशन नसून, झाड वाढेपर्यंत त्याची देखभाल करण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय अनेकांसाठी अनुकरणीय आहे. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक ठोस पाऊल टाकले गेले आहे.

या उपक्रमाच्या वेळी परिट समाजाचे शहराध्यक्ष रमेश ठाकरे, जिल्हाध्यक्ष कैलास शिलोडे, मनोहर लोणे, सुनील अराक, कैलास पारधी, बापू सोनवणे, कैलास शकोकारे, तेजोदिप फाउंडेशनचे सचिव वसंत कोलते, पर्यावरण जागरण प्रतिष्ठानचे सुरेंद्रसिंह पाटील, कलीम पायलट, कालू शहा, किशोर शिंपी, विनोद गोरधे, सतीष कांबळे, निलेश फिरके, मधुकर पाटील, सागर एएवाणी, लढे सर, कमलेश चौधरी, संतोष बनसोडे, विनोद सुरवाडे, प्रकाश पवार, दिपक परदेशी, प्रेम परदेशी यांच्यासह त्यांचे मित्रपरिवार उपस्थित होता.

संतोष शेलोडे यांचा हा पर्यावरणपूरक उपक्रम केवळ वाढदिवस साजरा करण्याची नवी पद्धत नसून, भविष्यासाठी एक सकारात्मक संदेश आहे. वाढत्या पर्यावरणीय संकटाच्या पार्श्वभूमीवर असे छोटे छोटे उपक्रमच मोठे बदल घडवू शकतात.


Protected Content

Play sound