संतोष देशमुखांना टॉर्चर करुन ठार मारले : खा. सोनवणे

बीड-वृत्तसेवा | संतोष देशमुख यांना मोठ्या प्रमाणात टॉर्चर करून ठार मारण्यात आले असून यातील आरोपी मोकाट असल्याचा आरोप खासदार बजरंग सोनवणे यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे.

आज बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी पत्रकार परिषद घेऊन मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येबाबत आरोपांच्या फैरी झाडल्या. ते म्हणाले की, संतोष देशमुख यांची अतिशय क्रूर पध्दतीत हत्या करण्यात आली असून याआधी त्यांचे भयंकर हाल करण्यात आले. ते म्हणाले की, 6 डिसेंबर या दिवशी आरोपींनी मस्साजोगचं जे आवादा कंपनीचं ऑफिस आहे तिथे अधिकाऱ्यांवर हल्ला केला. तिथल्या वॉचमनलाही मारलं गेलं. संतोष देशमुख सरपंच होते. त्यांना या घटनेबाबत सांगण्यात आलं. सरपंच संतोष देशमुख यांनी गावातील व्यक्तीला मदत करण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांनाही मारहाण करण्यात आली. लोक मधे पडले, त्यांनी वाद सोडवला. यात थातूर मातूर तक्रार दाखल करण्यात आल्याचा आरोप खासदार सोनवणे यांनी केला.

दरम्यान, संतोष देशमुख 10 वर्षांपासून राजकारणात आहे. उत्तम काम करणारा माणूस होता त्याला ठार करण्यात आलं. संतोष देशमुख यांची हत्या टॉर्चर करुन करण्यात आली आहे हे मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे. शवविच्छेदन अहवाल आला त्यात 56 वण आहेत. त्यात एकावर एक किती झाले असतील? याचा विचार केलेलाच बरा. डोळ्यांवर, पाठीवर, पोटावर हे वण आहेत. बरगड्या मोडल्या आहेत. त्याचा गुन्हा काय होता? त्याने गावातल्या वॉचमनला मदत केली ही त्याची एवढी मोठी चूक घडली का? जर पोलीस अधीक्षकांनी वेळीच गुन्हा नोंद केला असता तर कदाचित पुढे गोष्टी घडल्या नसत्या असंही सोनावणे यांनी म्हटलं आहे.
या प्रकरणी 28 तारखेला भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती देखील खासदार बजरंग सोनवणे यांनी याप्रसंगी दिली.

Protected Content