भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारतीय जनता पक्षातर्फे रक्षा खडसे यांचे नाव जाहीर झालेले असताना आज भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी सिल्वर ओक येथे शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ते आगामी निवडणुकीसाठी आपला दावा दाखल करतील असे संकेत आता मिळालेले आहेत.
या संदर्भातील माहिती अशी की, दोन दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाच्या दुसर्या यादीत रावेर मतदार संघामधून रक्षाताई खडसे यांना लागोपाठ तिसर्यांदा उमेदवारी मिळाली. त्यांच्या उमेदवारीमुळे पक्षामध्ये काहीसे नाराजीचे वातावरण दिसून आले. विशेष करून तिकीटासाठी उत्सुक असलेले भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्या समर्थकांनी राजीनामे देऊन आपला रोष व्यक्त केला. यानंतर शरदचंद्र पवार गटातर्फे नेमके कुणाला तिकीट मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यात पहिल्यांदा राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे एकनाथराव खडसे किंवा त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना तिकीट मिळेल असे मानले जात होते. मात्र या दोघांची नावे मागे पडल्यानंतर पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील अथवा यावल येथील माजी नगराध्यक्ष अतुल वसंतराव पाटील यांना तिकीट मिळू शकते असे संकेत मिळाले. या सर्व बाबींची चर्चा सुरू असतानाच आज भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी आज मुंबई येथे सिल्वर ओक बंगल्यावर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. याप्रसंगी त्यांच्यात आगामी निवडणुकीबाबत उमेदवारीसाठी चर्चा झाली. यासंदर्भात लाईव्ह ट्रेंडस न्यूजने माजी आमदार संतोष चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपली भेट झाली असल्याच्या चर्चेला दुजोरा दिला. मात्र उमेदवारी बाबत लवकरच घोषणा होईल आणि त्यात जो निर्णय असेल तो आपल्याला मान्य असेल तर त्यांनी सांगितले. तर अचानक संतोष चौधरी यांचे नाव समोर आल्यामुळे रावेर मधील मुकाबला ऐन वेळेस रंगतदार होण्याची शक्यता आहे.