Home Cities जामनेर पहूरमध्ये संत शिरोमणी रोहिदास महाराजांची जयंती उत्साहात 

पहूरमध्ये संत शिरोमणी रोहिदास महाराजांची जयंती उत्साहात 


पहूर, ता. जामनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पहूर पेठ ग्रामपंचायतीच्या वतीने संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची ६४९ वी जयंती भक्तिभाव व सामाजिक सलोख्याच्या वातावरणात साजरी करण्यात आली. समाजातील सर्व घटकांचा सहभाग लाभलेल्या या कार्यक्रमातून संत रोहिदास महाराजांच्या समता, बंधुता आणि मानवतावादी विचारांना उजाळा देण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करण्यात आले. त्यानंतर चर्मकार समाजासाठी पहूर पेठ ग्रामपंचायतीने सभागृह बांधकामासाठी ८,००० स्क्वेअर फुट भूखंड उपलब्ध करून दिल्याबद्दल लोकनियुक्त सरपंच अब्बू तडवी तसेच माजी जिल्हा परिषद कृषी सभापती प्रदीप लोढा यांचा चर्मकार समाजातर्फे सत्कार करण्यात आला. या निर्णयामुळे समाजाच्या विकासाला चालना मिळेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

यावेळी माजी केंद्रप्रमुख रामचंद्र वानखेडे आणि माजी मुख्याध्यापक प्रल्हाद वानखेडे यांनी आपल्या मनोगतातून संत रोहिदास महाराजांच्या सामाजिक कार्याचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी संतांच्या विचारांनी समाजात समता, श्रमप्रतिष्ठा आणि माणुसकीची मूल्ये रुजवल्याचे नमूद केले. संतांचे कार्य केवळ एका समाजापुरते मर्यादित नसून ते सर्व समाजासाठी मार्गदर्शक ठरले आहे, असा संदेश त्यांनी दिला.

माजी जिल्हा परिषद कृषी सभापती तथा ग्रामपंचायत सदस्य प्रदीप भाऊ लोढा यांनीही आपल्या भाषणातून संत रोहिदास महाराजांचे कार्य सर्वसमावेशक असल्याचे अधोरेखित केले. कोणत्याही जाती-धर्मातील संतांनी समाजहितच जोपासले असून संत रोहिदास महाराज यांचे कार्यही त्याच व्यापक दृष्टीकोनातून पाहावे, असे मत त्यांनी मांडले.

या कार्यक्रमास पहूर पेठचे लोकनियुक्त सरपंच अब्बू तडवी, योगेंद्र वानखेडे, डॉ. जितेंद्र वानखेडे, महेश वानखेडे, प्रवीण वानखेडे, शहर पत्रकार संघाचे उपाध्यक्ष जयंत जोशी, मुन्ना देशमुख, सुधीर गुरव यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी, विविध समाज बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी योगेंद्र वानखेडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.


Protected Content

Play sound