यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल येथील जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलच्या वतीने आयोजित संस्कार स्नेहसंमेलन २०२५-२६ हा कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली.

शाळेचे अध्यक्ष शरद जीवराम महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे उपाध्यक्ष लिलाधर चौधरी, यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझिरकर, आरतीताई शरद महाजन, गट शिक्षण अधिकारी विश्वनाथ धनके, तसेच उल्पल चौधरी, रवींद्र पाटील, उल्हास चौधरी, ए. बी. महाजन, नितीन महाजन, प्रभाकर आप्पा सोनवणे, जी. जी. वाघुळदे सर, शाकीर सर, सेमी माध्यमाच्या प्राचार्या सौ. रंजना महाजन, इंग्लिश माध्यमाच्या प्राचार्या श्रीमती दिपाली धांडे, प्रवीण झोपे सर, पर्यवेक्षिका सौ. राजश्री लोखंडे व सौ. गौरी भिरूड आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन, गणेश पूजन, प्रभू श्रीरामचंद्र पूजन तसेच शाळेचे संस्थापक स्वर्गीय दादासाहेब जे. टी. महाजन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन झाले आणि उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्यांनी प्रास्ताविक सादर करत शाळेची शैक्षणिक वाटचाल व उपक्रमांची माहिती दिली.
यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना जीवनातील प्रामाणिकपणाचे महत्त्व पटवून दिले. लहानपणीचा एक अनुभव सांगत त्यांनी, भविष्यात जे व्हायचे आहे ते नक्की बना, मात्र जे कराल ते प्रामाणिकपणे व जबाबदारीने करा, असा संदेश दिला. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी चिमुकल्यांमध्ये उत्साह संचारला. गट शिक्षण अधिकारी विश्वनाथ धनके यांनीही शाळेच्या पुढील वाटचालीसाठी संपूर्ण शैक्षणिक टीमला शुभेच्छा देत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शरद जीवराम महाजन यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करत सर्वांगीण विकास हेच खरे शिक्षण असल्याचे नमूद केले. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, शारीरिक आणि सांस्कृतिक विकासासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
यानंतर गणेश वंदनेच्या सामूहिक नृत्याने स्नेहसंमेलनाची रंगतदार सुरुवात झाली. कोळी नृत्य, नारी सन्मान, शेतकरी नृत्य, देवी स्तुती, सामूहिक नृत्य, देशभक्तीपर नृत्य तसेच नाटिका अशा विविध बहारदार कार्यक्रमांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. या सादरीकरणांना उपस्थित रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली, तर काही कार्यक्रमांनी विशेष लक्ष वेधून घेतले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मनीषा पाटील व सौ. श्रद्धा बडगुजर यांनी प्रभावीपणे केले. शाळेच्या विद्यार्थिनींच्या सहभागामुळे सूत्रसंचालनात अधिक रंगत आली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिक्षिका सौ. प्रीती भार्गव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पर्यवेक्षिका सौ. गौरी भिरूड व सौ. राजश्री लोखंडे यांनी मार्गदर्शन केले.



