भुसावळ प्रतिनिधी । येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रतिष्ठापन कार्यक्रम नुकताच घेण्यात आला होता. यात निलेश गोरे यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी कसे व्हायचे यावर मार्गदर्शन केले.
याबाबत माहिती अशी की, निलेश गोरे पुढे म्हणाले की, तरुणाईला श्रीमंत लोकांचे खूप आकर्षण असते, तरुणपणात तर प्रत्येकाला आपल्याकडे पैशांच्या राशी असाव्यात असे वाटते. श्रीमंतीची स्वप्ने रंगवण्यात तर आपला हात कुणीच धरू शकणार नाही. पण वयाच्या 35 ते 40 नंतर आपल्यापैकी ९०% जणांच्या लक्षात येते की, आपल्याला अपेक्षित असलेली श्रीमंती आपल्या आवाक्यात नव्हती, ते फक्त एक स्वप्न होते. आणि पुढचे आयुष्य आता आपल्याला मध्यमवर्गीय म्हणूनच जगावे लागणार आहे. श्रीमंत व्हायचे असेल तर आधी श्रीमंती म्हणजे काय ते समजून घेतले पाहिजे. श्रीमंत लोक श्रीमंत का होतात याचा अभ्यास केला पाहिजे. पैसा आणि श्रीमंती यातला फरक ओळखता आला पाहिजे असा सल्ला देत यशस्वी कसं व्हायचं? श्रीमंती म्हणजे काय ? श्रीमंत लोक श्रीमंत कशामुळे होतात ? श्रीमंत होण्यात आपण कुठे कमी पडतोय ? या बद्दलचे सिक्रेट्स निलेश गोरेंनी या कार्यक्रमावेळी दिली.
विद्यार्थ्यांना गोल सेटिंगचे सिक्रेट सांगतांना ते म्हणाले की, निष्पत्ती आणि ध्येय यातील फरक ओळखा कारण बहुतांशी तरुण हे निष्पत्तीलाच ध्येय समजतात आणि भरकटतात व स्वप्न अपुरे राहतात. तुमचे ध्येय बिझनेसचे असू द्या किंवा इतर काहीही ते तुमच्या डोक्यात पक्के करा. आता त्या ध्येयांना तुमच्या जीवनाचा भाग बनवा. तुम्ही ही ध्येय कशाप्रकारे साध्य कराल, यावर भर द्या. तुमच्या ध्येयांना जीवनात प्राधान्य द्या. तेव्हा तुम्ही ध्येय साध्य करण्याच्या दिशेने विचार कराल, असे केल्यास तुम्ही ठरवलेले ध्येय आणि अपेक्षा साध्य करू शकता व यश मिळवता येईल. सोबतच ध्येयावर लक्ष कसे केंद्रित करावे? द्विधा मनस्थिती कशी टाळावी व एकनिष्ठ होवून ध्येय कशे गाठावे याबद्दलचे मार्गदर्शन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी ते म्हणाले की, “श्रीमंत होणं आणि श्रीमंती टिकवणं वाटतं तेवढ सोपं नसतं. त्याला भरपूर बुद्धिबळ वापरावा लागत व कष्ट हि तेवढेच करावे लागतात”प्रसंगी प्रा.एस.व्ही.राजपूत, प्रा.किशोर चौधरी, प्रा.धिरज पाटील व विद्यार्थींची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.