मुंबई—लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । मुंबई महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांनी मुंबईतील बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढण्याची घोषणा केल्यानंतर, ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. “बांगलादेशात हिंदूंची मंदिरे पाडली जात असताना आणि त्यांच्या कत्तली होत असताना, केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात बांगलादेशासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद का केली?” असा खळबळजनक सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.
मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, बांगलादेशातील हिंदू सध्या अत्यंत कठीण परिस्थितीत आहेत. त्यांची दुकाने जाळली जात आहेत. अशा परिस्थितीत ‘हिंदुत्वा’च्या गप्पा मारणारे सरकार बांगलादेशला आर्थिक मदत देऊन नक्की काय साध्य करत आहे? महापौरांनी केवळ घोषणाबाजी करण्यापेक्षा दिल्लीत जाऊन आपल्याच सरकारला या मदतीबद्दल जाब विचारावा, असा खोचक सल्लाही त्यांनी दिला. “घुसखोरांना हकलण्याचे अधिकार महापौरांना नसून ते काम मुख्यमंत्र्यांचे आहे, महापौरांनी उगाच हिंदू-मुस्लिम राजकारण करू नये,” अशी टीका त्यांनी केली.

नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांच्या निवडीवर बोलताना राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपला आता कुठे उमजले आहे की, मुंबईतील मराठी माणूस हादेखील हिंदू आहे. दबावापोटी त्यांना मराठी महापौर द्यावा लागला, असे ते म्हणाले. याचवेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात अभिनेता सलमान खानच्या उपस्थितीवरूनही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “संघाला गर्दी जमवण्यासाठी सेलिब्रिटी हवा होता की आता मुस्लिमांनाही संघात प्रवेश मिळणार आहे? हे मोहन भागवत यांनी स्पष्ट करावे,” असे राऊत म्हणाले.



