मुंबई । काँग्रेस पक्ष हा कधीही न मरणार्या म्हातारी सारखा असल्याचे वर्णन एकदा बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांनी केले होते; याची आठवण करून देत, आता या म्हातारीचे काय करायचे हे राहूल गांधींनी ठरवायला हवे असा सल्ला आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.
सविस्तर वृत्त सोबतच्या लिंकवर क्लिक करून वाचा
शिवसेनेचे मुखपत्र असणार्या दैनिक सामनामध्ये आज काँग्रेसमधील अंतर्गत कलहावर भाष्य करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, काँग्रेसमधील २३ ज्येष्ठांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्राने फक्त धुरळा उडाला इतकेच झाले. राजकारणात असे पत्रव्यवहार नेहमीच होत असतात. काँग्रेसला सक्रिय, पूर्णवेळ अध्यक्ष नेमा ही ज्येष्ठांची मागणी योग्यच आहे, पण अध्यक्ष करायचे कोणाला? सक्रिय होण्यास कोणी कोणास थांबवले आहे? राहुल गांधींना रोखायचे ही सक्रियता मात्र काँग्रेसचे अस्तित्वच नष्ट करणारी ठरेल!
यात पुढे म्हटले आहे की, गुलाम नबी आझाद, वीरप्पा मोईली, कपिल सिब्बल, आनंद शर्मा, मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण, मनीष तिवारी असे हे सर्व नेते. यापैकी अनेकांना मोठा जनाधार नाही. पण काँग्रेस पक्षात व सत्तेत त्यांनी अनेक वर्षे मोठी पदे भोगली आहेत. आज देश पातळीवर विचार केला तर अनेक राज्यांत काँग्रेस संपलीच आहे. काँग्रेसचा जनाधार रसातळाला गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर ताकदीने उभे राहील असे नेतृत्व काँग्रेस पक्षात दूरदूरपर्यंत दिसत नाही.
यात म्हटले आहे की, काँग्रेस पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष मिळावा अशी मागणी करण्यात चुकीचे काय, हा प्रश्न अनेकांना पडू शकतो. पण ही मागणी सहज नव्हती व त्यामागे भाजप पुरस्कृत राजकारण होते, असा आरोप काँग्रेस कार्यकारिणीतच करण्यात आला. राहुल गांधी हे सतत सरकारच्या व्यवहारांवर टीका करीत आहेत. अनेक उद्योगपतींना मोदींचे सरकार नियमबाहय पद्धतीने लाभ पोहोचवीत असल्याचे आरोप ते करीत आहेत. यामुळे अस्वस्थ झालेल्या कॉर्पोरेट लॉबीनेच काँग्रेस गांधीमुक्त करण्याचा विडा उचलला. सोनिया, प्रियांका, राहुल यांनी काँग्रेसच्या सक्रिय कार्यातून दूर व्हावे व मार्गदर्शक मंडळाचे सभासद म्हणून काम करावे असे या सर्व मंडळींचे डावपेच होते. ते सफल झाले नाहीत, असे काँग्रेसमधील मोठ्या गटाचे म्हणणे आहे.
गांधी घराण्याबाहेरची व्यक्ती काँग्रेसच्या अध्यक्षपदी यावी हा विचार चांगला आहे. पण त्या लायकीची आणि ताकदीची व्यक्ती काँग्रेस पक्षात आज उरली आहे? ज्या २३ काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिले त्यातील एकही नेता काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवू शकेल अशा कुवतीचा नाही. काँग्रेस पक्ष आज दिशाहीन आणि नेतृत्वहीन झाला. त्यास जबाबदार कोणी असले तरी ज्वलंत हिंदुत्वाने बेगडी धर्मनिरपेक्षतेवर केलेली मात हेच त्यामागचे खरे कारण आहे.
यात शेवटी म्हटले आहे की, काँग्रेस पक्ष आजही संपूर्ण देशाला माहीत असलेला व प्रत्येक गावात कार्यकर्ता असलेला पक्ष आहे. ममता बॅनर्जी, जगनमोहन रेड्डी, शरद पवार, नवीन पटनायक, तेलंगणाचे के. चंद्रशेखर राव हे सर्व मुख्यमंत्री मूळचे काँग्रेसवाले आहेत व त्या त्या राज्यांतील काँग्रेसचाच जनाधार त्यांनी लुटला आहे. महाराष्ट्रात शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे मूळ काँग्रेसचेच अपत्य आहे. राज्याराज्यांत काँग्रेस आहे, फक्त मूळ चेहर्यावरचे मुखवटे बदलले आहेत. या सगळयांनी मुखवटे काढून फेकले तरी देशात काँग्रेस एक प्रबळ पक्ष म्हणून उभारी घेईल. तरुण वर्गाला आज काँग्रेसचे आकर्षण का वाटत नाही याचे मंथन सोनिया गांधी यांना पत्र लिहिणार्या २३ नेत्यांनी करायलाच हवे. काँग्रेस पक्ष ही कधीही न मरणारी म्हातारी आहे, असे वर्णन एकदा बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांनी केले होते. या म्हातारीचे काय करायचे हे राहुल गांधींनीच ठरवायला हवे! असे यात म्हटले आहे.