मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | छत्रपती संभाजीराजे यांच्या उमेदवारीला विरोध करणारे संजय राऊत यांना मराठा क्रांती मोर्चाने इशारा दिला आहे.
छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, मगच त्यांना राज्यसभेची उमेदवारी देणार असल्याची भूमिका शिवसेने घेतली. त्यांनी याला प्रतिसाद न दिल्यामुळे शिवसेनेने आपले कट्टर कार्यकर्ते तथा कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राजेंपेक्षा मावळे महत्वाचे असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी याबाबतची घोषणा केली. यावरून आता मराठा क्रांती मोर्चाने संजय राऊत यांना इशारा दिला आहे.
मराठा क्रांती मोर्चेचे समन्वयक अंकुश कदम यांनी जारी केलेल्या व्हिडीओमधून म्हटले आहे की, छत्रपतींच्या अपक्ष उमेदवारीला संजय राऊत सातत्याने विरोध करताना दिसत आहेत. एकीकडे प्रियंका चतुर्वेदी, उर्मिला मातोंडकर यांना कुठल्याही प्रकारच्या अटी शर्थी न घालता राज्यसभेवर पाठवण्याची तयारी दाखवता आणि ज्या छत्रपतींच्या नावावरती एवढं वर्ष राजकारण करत आहेत, सत्ता भोगत आहेत (त्यांनाच विरोध करता.) या शिवसेनेचा ‘शिव’च आमच्या छत्रपतींचा आहे, असं असताना देखील संजय राऊत हे सातत्याने विरोध करताना दिसत आहेत. संजय राऊत तुमचा हा सत्तेचा माज महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही. २०२४ ला तुम्हाला याची राजकीय किंमत मोजावी लागेलच पण छत्रपती संभाजीराजे अपक्षच निवडणूक लढवणार, असे कदम यांनी या व्हिडीओत म्हटले आहे.