मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | खासदार संजय राऊत Sanjay Raut यांच्या घरी भल्या पहाटे ईडीचे पथक दाखल झाले असून त्यांची चौकशी सुरू करण्यात आल्यानंतर राऊत यांनी ट्विट करून तरीही शिवसेना सोडणार नसल्याचे सांगितले आहे.
पत्रा चाळ प्रकरणात या आधीच सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना पाच वेळेस चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. मात्र ते चौकशीसाठी हजर झालेले नाहीत. या पार्श्वभूमिवर, आज भल्या पहाटेच ईडीचे पथक संजय राऊत यांच्या निवासस्थानी दाखल झाले असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.
दरम्यान, आज पहाटे सात वाजेपासून ईडीचे दहा अधिकारी हे सीआरपीएफच्या जवानांसह संजय राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी दाखल झाले. त्यांनी तातडीने राऊत आणि त्यांच्या कुटुंबियांची कसून चौकशी सुरू केली. ही माहिती समोर येताच भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि आमदार नितेश राणे यांनी राऊत यांना हिशोब द्यावा लागणार असल्याचे सांगितले. तर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी चौकशीतून सत्य समोर येणार असल्याची सावध प्रतिक्रिया दिली.
यानंतर सकाळी पावणेनऊच्या सुमारास संजय राऊत यांनी ट्विट करून तरीही आपण शिवसेना सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. यानंतर दुसर्या ट्विटमध्ये त्यांनी महाराष्ट्र आणि शिवसैनिक लढतच राहतील असे सांगितले. यानंतर त्यांनी तिसर्या ट्विटमध्ये पत्रचाळ प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसून हे आपण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन सांगत आहोत. बाळासाहेबांनी आपल्याला लढायला शिकवले असल्याचे त्यांनी या ट्विटमध्ये नमूद केले आहे. तर दुसरीकडे राऊत यांच्या निवासस्थानी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करून ईडी आणि भाजपचा निषेध केला आहे.