मुंबई प्रतिनिधी । शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आक्षेपार्ह शब्दाबाबत अभिनेत्री कंगना राणावत हिची माफी मागण्याची तयारी दर्शविली असली तरी यासाठी एक अट टाकली आहे.
नुकत्याच एका मुलाखतीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अभिनेत्री कंगना राणावत हिला हरामखोर मुलगी असे संबोधल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. संजय राऊत यांनी कंगनाची माफी मागावी अशी मागणी केली जात आहे. त्यावर जर कंगनाने महाराष्ट्राची माफी मागितली तर मी तिची माफी मागण्याचा विचार करेन, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. राऊत म्हटले की, तिने मुंबईला मिनी पाकिस्तान म्हटलं. हेच अहमदाबादबद्दल बोलायची तिच्यात हिंमत आहे का? कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. तिच्या या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.
खा. राऊत यांनी आज (दि. ६) सकाळी एक ट्विट करून कंगनाला पुन्हा शायरीच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे. त्यांनी ‘मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी न करना, पहले भी कई तूफानों का रुख मोड चुका हूँ,’ असे ट्विट करून पुन्हा एकदा नाव न घेता कंगना व तिच्या समर्थनातील लोकांना टोला लगावला आहे.