धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि पक्ष संघटना बळकट करण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने धरणगाव तालुक्यात महत्त्वपूर्ण नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये पिंपळेकर संजय पाटील यांची धरणगाव तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून (१९९९) फाउंडर सदस्य असलेल्या आणि निष्ठावंत मानल्या जाणाऱ्या संजय पाटील यांना या नियुक्तीमुळे न्याय मिळाल्याचे बोलले जात आहे. त्यांच्यासोबतच इतर पदाधिकाऱ्यांच्याही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे, तर सोनवदच्या माजी सरपंच आशा उज्ज्वल पाटील यांना महिला तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बांभोरीचे सक्रिय सदस्य हितेंद्र पाटील यांची तालुका कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी नियुक्तीपत्रे दिली. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी आणि पवार साहेबांचे विचार जनमानसात रुजवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच, त्यांच्या माध्यमातून सर्व फ्रंटलच्या नियुक्त्या लवकरच होतील, असेही ते म्हणाले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस वाय. एस. महाजन, ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील, माजी युवती जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील, युवक जिल्हाध्यक्ष विश्वजित पाटील, सोनवदचे माजी सरपंच उज्ज्वल पाटील, धरणगाव शहराध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, प्रा. आकाश बिवाल, घनश्याम कुंभार, ग्रंथपाल मोहन पाटील आणि दिनेश भदाणे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.



