

यावल–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सांगवी येथील ज्योती विद्यामंदिरात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करून निवडून आलेल्या शिक्षक व समाजकार्यकर्त्यांचा संयुक्त सत्कार सोहळा उत्साहाच्या वातावरणात पार पडला. शिक्षकी क्षेत्र, पतपेढी व्यवस्थापन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडून आलेल्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. शिक्षण संस्थेने पुढाकार घेऊन असा एकत्रित सत्कार आयोजित केल्याने परिसरात सकारात्मक भावना व्यक्त होत आहे.
तालुक्यातील सांगवी येथील ज्योती विद्यामंदिरातून जळगाव जिल्हा शिक्षक-शिक्षकेतर पतपेढीच्या तज्ज्ञ संचालकपदी निवड झालेले एच. डी. भिरुड, जळगाव जिल्हा पतपेढीचे बिनविरोध संचालक डी. ए. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर प्रभात विद्यालय, हिंगोणे येथील सिद्धेश्वर वाघुळदे यांची फैजपूर नगरसेवकपदी झालेली बिनविरोध निवड आणि अरुण सपकाळे यांची कलाध्यापक संघाच्या अध्यक्षपदी झालेली निवड यांचाही सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला. या सर्व मान्यवरांचा एकत्रित सन्मान सोहळा दिमाखदारपणे पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे सचिव उल्हास निंबा चौधरी यांनी भूषवले. प्रमुख पाहुण्यांमध्ये जळगाव पतपेढीचे संचालक दिगंबर पाटील, जळगावचे व्हि. ओ. चौधरी, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष जयंत चौधरी, प्राचार्य व्हि. जि. तेली, संजीव बोठे तसेच डॉक्टर संघटनेचे जिल्हाध्यक्ष नंदन वंडींकार आदी मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाची शान वाढवणारी ठरली.
सत्कार सोहळ्यातील विशेष आकर्षण होते — शिक्षक नेते एस. डी. भिरुड यांचा गौरव. शिक्षकांच्या हक्कांसाठी त्यांनी केलेला सातत्यपूर्ण लढा, विविध प्रश्नांना न्याय मिळवून देण्यात त्यांनी निभावलेली भरीव भूमिका याची सर्वांनी प्रशंसा केली. शिक्षकांमध्ये विश्वासाचे प्रतीक म्हणून ओळख असलेल्या भिरुड यांच्या निवडीचे जिल्हाभरातून स्वागत होत आहे. त्यांच्या कार्याचा उजाळा देताना मान्यवरांनी त्यांना “शिक्षकांचा आवाज” असे संबोधले.
फैजपूर शहरातील सामाजिक बांधिलकी, शैक्षणिक उपक्रम आणि नागरिकांशी सलोख्याचे संबंध या गुणांच्या आधारे सिद्धेश्वर वाघुळदे यांची बिनविरोध नगरसेवक म्हणून झालेली निवड ‘कामाचा मान’ म्हणून गौरवण्यात आली. त्यांच्या निवडीनंतर नागरिकांचे आभार मानताना त्यांनी पुढील काळात अधिक वेगाने विकासकामे करण्याचा संकल्प व्यक्त केला.
दरम्यान, यावल–रावेर मतदारसंघाचे आमदार अमोल हरीभाऊ जावळे यांनी दूरध्वनीद्वारे तिन्ही निवडून आलेल्या मान्यवरांचे अभिनंदन केले. “त्यांची निवड ही त्यांच्या कार्याची पावती असून त्यांनी पुढील काळातही विकासाचा मार्ग उजळवत राहावे,” अशा शब्दांत आमदारांनी त्यांचे कौतुक केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्योती विद्यामंदिरचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, भुसावळ पतपेढीचे सचिव चेतन तळले, आमोदय येथील अजित पाटील, ललित सुपे, न्यू इंग्लिश स्कूल भालोदचे प्राचार्य डी. व्ही. चौधरी, कठोरा विद्यालयाचे प्राचार्य नितीन झांबरे, यावल पतपेढीचे अध्यक्ष किरण झांबरे तसेच आदर्श विद्यालय दहिगावचे गणेश महाजन यांनी मनापासून परिश्रम घेतले.



