रोटरी गतीमंद विद्यालयाच्या निधी उभारणीसाठी ‘संगीत से मुस्कान’ कार्यक्रम

खामगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सुपरिचित स्वयंसेवी संगठन रोटरी क्लब खामगांवतर्फे रोटरी गतीमंद विद्यालय व रोटरी इंग्लिश स्कुल आणि इतर समाजपयोगी कार्याच्या सहाय्यार्थ रविवार दिनांक २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० ते ९ या दरम्यान श्रीहरी लॉन्स, नांदुरा रोड, खामगांवच्या भव्य प्रांगणात इव्हेन्ट स्पॉन्सरर एमिराल्ड सिटी यांच्या प्रायोजकत्वाखाली “संगीत से मुस्कान” या संगीताच्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

यातून प्राप्त झालेले उत्पन्न गतीमंद मुलांचे शिक्षणाकरीता, गतीमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांचे व्होकेशनल प्रशिक्षणाकरीता, गतीमंद विद्यार्थ्यांना त्यांचे पायावर उभे करण्यास मदत करण्याकरीता आणि खामगांव नजीकच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे व इतर लोकोपयोगी प्रकल्प राबविता यावेत यासाठी वापरण्यांत येणार आहे.

या कार्यक्रमात पुणे व मुंबई येथील संगीत जगतातील विद्यमान पार्श्वगायक जसे की प्रशांत नासेरी, रसिका गानु, राजेश्वरी पवार आणि धवल चांदवडकर हे जुन्या-नवीन हिन्दी-मराठी सर्व प्रकारच्या गाण्यांनी श्रोत्यांचे मनोरंजन करणार आहेत. शिक्षा शर्मासारख्या कसलेल्या निवेदिका या कार्यक्रमाचे ओघवते संचालन करणार आहेत. वाद्यवृंद हा इंदोर येथील असून सुप्रसिद्ध आयोजक राजेश अग्रवाल यांनी या सर्वांची सांगड साधलेली आहे. यामध्ये सर्वांना परवडेल अशा पद्धतीने गोल्ड व सिल्व्हर अशा २ प्रकारच्या बैठक व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत. कार्यक्रम संपल्यानंतर त्याच ठिकाणी भोजनाचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे.

“संगीत से मुस्कान” कार्यक्रम संस्मरणीय ठरावे याकरीता सर्व रोटरी सदस्य उत्कृष्ट नियोजनासह परीश्रम करीत आहेत. “मनोरंजनासोबत वंचितांची सेवा आणि त्यांच्या चेहऱ्यावर फुलणारे निरागस हास्य” यांचे दर्शन घडावे हा उदात्त दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यावा, असे आवाहन रोटरी क्लब अध्यक्ष विजय पटेल, सचिव किशन मोहता व प्रकल्पप्रमुख सुनील नवघरे यांनी केलेले आहे.

प्रवेशपत्र पंचरत्न ज्वेलर्स (मोहन मार्केट) येथून प्राप्त करून घेता येतील. अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक ९४२२८८१९९०, ९४२२९२७०४३, ९८८११७७९९९ किंवा ९४२२८१००११ यांचेशी संपर्क साधता येईल.

Protected Content