Home क्राईम चोपडा महसूल हद्दीतून वाळू वाहतुकीस मनाई ; तापी नदीपात्रात नायब तहसीलदारांकडून हद्द...

चोपडा महसूल हद्दीतून वाळू वाहतुकीस मनाई ; तापी नदीपात्रात नायब तहसीलदारांकडून हद्द निश्चिती


चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  तापी नदी पात्रातून होत असलेल्या वाळू वाहतुकीबाबत महसूल हद्दींचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर चोपडा तालुक्यात प्रशासनाने तात्काळ कारवाई करत स्पष्ट भूमिका घेतली आहे. अमळनेर तालुक्यातील वाळू वाहतूक करणारी ट्रॅक्टरे चोपडा महसूल हद्दीतून ये-जा करत असल्याची माहिती समोर आल्यानंतर नायब तहसीलदार योगेश पाटील यांनी प्रत्यक्ष तापी नदी पात्रात जाऊन परिस्थितीची पाहणी करत महसूल हद्दीची निश्चिती केली.

दि. 30 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास तापी नदी पात्रातून वाळू वाहतूक चोपडा महसूल हद्दीतून होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर नायब तहसीलदार योगेश पाटील ग्राम अधिकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पाहणीदरम्यान अमळनेर महसूल हद्दीतील दापोडी, मुंगसे, नारखेडे आणि धावडे परिसरात सुरू असलेला वाळू उपसा ट्रॅक्टरद्वारे चोपडा महसूल हद्दीतून वाहतूक केला जात असल्याचे आढळून आले.

यावेळी सर्व संबंधित ट्रॅक्टर तात्काळ थांबवून प्रत्यक्ष मोजमाप करून महसूल हद्द स्पष्टपणे निश्चित करून दाखवण्यात आली. तसेच यापुढे चोपडा महसूल हद्दीतून वाळू वाहतूक केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा कडक इशारा ठेकेदारांना देण्यात आला. प्रशासनाच्या या कारवाईमुळे अवैध गौणखनिज वाहतुकीवर अंकुश बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

या कारवाईच्या वेळी नायब तहसीलदार दत्तात्रय सैंदाने, मंडलाधिकारी सुरेश पाटील, ग्राम अधिकारी तिलेश पवार तसेच अमळनेरचे ग्राम अधिकारी प्रकाश महाजन उपस्थित होते. प्रशासनाने घेतलेल्या या भूमिकेमुळे महसूल हद्दीतील स्पष्टता वाढली असून भविष्यात वाद आणि गैरसमज टाळण्यास मदत होणार आहे.

भविष्यात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये तसेच अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी महसूल हद्द निश्चित करण्यात आल्याचे नायब तहसीलदार योगेश पाटील यांनी स्पष्ट केले असून, नियमांचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.


Protected Content

Play sound