Home क्राईम वाळूमाफियांनी ओलांडली सीमा ; ५ शेतकऱ्यांवर फावड्याने हल्ला !

वाळूमाफियांनी ओलांडली सीमा ; ५ शेतकऱ्यांवर फावड्याने हल्ला !


धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील रेल शिवारात वाळू उपसा थांबवण्यास सांगणाऱ्या पाच शेतकऱ्यांवर वाळूमाफियांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विहिरींची पाणीपातळी कमी होत असल्याचे सांगत वाळू उपसा करण्यास विरोध केल्याने, संतप्त झालेल्या १६ वाळूमाफियांनी शेतकऱ्यांना शिवीगाळ करत लोखंडी फावडे आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेमुळे रेल परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, धरणगाव पोलिसांनी याप्रकरणी १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

असे आहे हे प्रकरण :
रेल शिवारातील गिरणा नदीपात्राच्या काठावर नरेंद्र केशरसिंग पाटील (वय ४१), संदीप रवींद्र पाटील, मनोज केशरसिंग पाटील, श्रीकांत पाटील आणि मंगल पाटील यांची शेती आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या विहिरींची पाणीपातळी झपाट्याने खाली जात होती. गुरुवारी, १ जानेवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास हे पाचही शेतकरी नदीपात्रात गेले आणि तेथे वाळू काढणाऱ्यांना “वाळूचा उपसा करू नका, त्यामुळे आमच्या विहिरींना पाणी कमी होते,” अशी विनंतीवजा सूचना दिली.

वाळूमाफियांचा क्रूर अवतार:
शेतकऱ्यांच्या या बोलण्याचा राग आल्याने गणेश मार्तंड सोनवणे, रामकृष्ण गोंविदा सपकाळे, श्रावण बबलू इंगळे, गोरख भगवान सपकाळे, विशाल एकनाथ सपकाळे, राजेंद्र रमेश सपकाळे, शरद नारायण सोनवणे, सागार बारकू सोनवणे, दिवनेश जगदीश सोनवणे, भाऊसाहेब गोविंदा सपकाळे, ज्ञानेश्वर नारायण सपकाळे, गणेश मधुकर सपकाळे, कृष्णा एकनाथ सपकाळे, प्रविण सुभाश सपकाळे, आणि शरद नारायण सपकाळे सर्व रा. कानळदा ता. जळगाव या १६ जणांच्या टोळीने एकत्र येऊन शेतकऱ्यांवर हल्ला चढवला. आरोपींनी लोखंडी फावड्याचा वापर करून शेतकऱ्यांना गंभीर दुखापत केली. या हल्ल्यात पाचही शेतकरी जखमी झाले आहेत.

पोलीस कारवाई:
या गंभीर घटनेनंतर शेतकरी नरेंद्र पाटील यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत शुक्रवारी, २ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता कानळदा येथील गणेश मार्तंड सोनवणे, रामकृष्ण गोविंदा सपकाळे, श्रावण बबलू इंगळे यांच्यासह १६ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हेडरकॉन्स्टेबल महेंद्र पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. वाळूमाफियांच्या या वाढत्या दहशतीमुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


Protected Content

Play sound