जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील शिवकॉलनी स्टॉपजवळून बेकायदेशीररित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई करत डंपर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी मंगळवारी २७ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता डंपरमालाकसह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, शहरातील शिवकॉलनी स्टॉपजवळून बेकायदेशीररित्या वाळूची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती विभागीय पोलीस अधिक्षक संदीप गावीत यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी हे मंगळवारी २७ डिसेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास शिवकॉलनी स्टॉपवर पेट्रोलिंग करत असतांना बांभोरीकडून शिवकॉलनीकडे येणारा डंपर क्रमांक (एमएच १९ झेड ६०६०) याची चौकशी केली. डंपरमध्ये ३ ब्रास वाळू भरलेले दिसून आले. वाळूची वाहतूकीचा परवानाबाबत विचारणा केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. दरम्यान, पोलीसांनी वाळूने भरलेला ट्रक रामानंदनगर पोलीस ठाण्यात जमा केला आहे. याप्रकरणी मंगळवारी २७ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता पोलीस कर्मचारी प्रविण वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डंपरमालक गोपल पारसकुमार ठाकूर रा. कोठारी नगर, चालक समाधान भावलाल पाथरवट आणि क्लिनर किशोर कैलास कोळी दोन्ही रा. साकेगाव ता.भुसावळ याच्यावर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुनिल पाटील करीत आहे.