मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमृता फडणवीस यांना लाच देण्याच्या प्रयत्नावर ठाकरे गटाने खोचक भाष्य करत त्यांना काही प्रश्न विचारले आहेत.
अमृता फडणवीस यांना एक कोटी रूपयांची लाच ऑफर करून त्यांना ट्रॅप करण्याचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले असून काल याबाबत स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. दरम्यान, या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून आज दैनिक सामनाच्या अग्रलेखात यावरून भाष्य करण्यात आले आहे.
या अग्रलेखात म्हटले आहे की, फडणवीस यांची अवस्था ’काय होतास तू, काय झालास तू’ अशीच काहीशी झाली आहे किंवा सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशा ’खोका’ अवस्थेला ते पोहोचले आहेत. शेतकर्यांचे लाल वादळ पायपीट करीत मुंबईत थडकले. शिळयापाक्या बुरशी आलेल्या भाकर्या खाऊन शेतकरी पायपीट करीत आहे. सरकारी कर्मचारी संपावर आहे. संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या विरोधात असताना तुम्ही राजकीय विरोधकांचेच काटे काढणार असाल तर काटयाने काटा काढण्याचे तंत्र इतरांनाही अवगत आहे.
सामनात पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्रातील शेतकर्यांनी रस्त्यांवर कांदा ओतून भाजप सरकारचा निषेध केला, पण नाकाने कांदे सोलण्याचे या सरकारचे काम सुरूच आहे. गेल्या सहा महिन्यांत भ्रष्टाचाराची प्रकरणे रोज उघड होऊनही उपमुख्यमंत्री फडणवीस फक्त ’आधीच्या सरकारने काय केले?’ हीच रेकॉर्ड वाजवून गुळगुळीत करीत आहेत.
या अग्रलेखात पुढे नमूद करण्यात आले आहे की, भ्रष्ट मार्गाने सत्तेवर आलेल्या सरकारने तत्त्व आणि नीतिमत्तेच्या फालतू वल्गना करू नयेत हेच बरे. अन्यथा तुमचेच वस्त्रहरण होईल. अमृता फडणवीस या शुद्ध आणि पवित्र आहेत. त्यांचे बोलणे हा त्यांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचा विषय आहे, पण १ कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न करणारे तुमच्या स्वयंपाक घरापर्यंत पोहोचले कसे? असा सवाल आजच्या सामनातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला आहे.