…तर लष्कराला आदेश द्या- शिवसेनेचा सल्ला

sanjay raut

मुंबई प्रतिनिधी । केंद्र सरकारला जर खरंच तुकडे…तुकडे गँगला धडा शिकवायचा असेल तर लष्कराला आदेश द्या असा सल्ला आज शिवसेनेने सामनातील अग्रलेखाच्या माध्यमातून दिला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या दैनिक सामनामध्ये आज सीमेवरील संघर्षाबाबत भाष्य केले आहे. यात म्हटले आहे की, लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी पदभार स्वीकारताच मराठी बाणा दाखवून दिला आहे. जनरल नरवणे यांनी नवी दिल्लीत ठणकावून सांगितले की, पाकव्याप्त कश्मीर आमचेच आहे. केंद्र सरकारने आदेश दिल्यास पाकव्याप्त कश्मीर ताब्यात घेऊ. जनरल नरवणे यांच्या वक्तव्याचे पडसाद पाकिस्तानात उमटू शकतात, पण असे पडसाद उमटले तरी पाकिस्तान काय करणार? कारण पंतप्रधान मोदी यांच्या सांगण्यानुसार पाकचे डोके ठेचले गेले आहे. जनरल यांनी चुकीचे काहीच सांगितले नाही. पाकव्याप्त कश्मीरमध्येच सर्वाधिक दहशतवादी तळ व प्रशिक्षण केंद्रे आहेत आणि पाकिस्तानचे लष्कर, आयएसआयच्या पाठिंब्याने हे तळ चालवले जात आहेत. मधल्या काळात आपल्याकडून जे काही सर्जिकल स्ट्राइक वगैरे झाले ते याच भागात, पण सर्जिकल स्ट्राइक होऊनही पाकडयांचे शेपूट वाकडे ते वाकडेच. त्यांच्या कुरापती काही थांबलेल्या नाहीत. कश्मीर खोर्‍यात आजही आमच्या सैनिकांचे रक्त सांडले जात आहे. रोज बलिदाने होत आहेत, पण कश्मीरचा प्रश्‍न हा राजकीय किंवा निवडणुकांपुरताच उसळून वर येतो व त्यावर राजकीय भाकर्‍या शेकल्या जातात. हे आता नित्याचेच झाले आहे.

अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील तुकडे-तुकडे गँग केंद्र सरकारचा रोष आहे. देशाचे तुकडे पाडण्यासंदर्भात घोषणाबाजी करणार्‍यांच्या विरोधात प्रति घोषणाबाजी करण्यापेक्षा ङ्गतुकडे-तुकडेफ गँगच्या कानाखाली अखंड हिंदुस्थानच्या नकाशाचा जाळ उठवला पाहिजे व त्यालाच आम्ही देशभक्ती म्हणतो. जनरल नरवणे यांनी त्याच दिशेने पाऊल टाकण्यासाठी केंद्राकडे आदेश मागितले आहेत. हिंदुस्थानचे लष्कर हे संविधानात्मक मूल्यांचे रक्षण करण्यास कटिबद्ध आहे. न्याय, स्वातंत्र्य, समानता व बंधुता या तत्त्वांचे रक्षण करण्यासाठी आमचे लष्कर कटिबद्ध आहे. नैतिकता, नियम व संकेत पाळणे हे आमच्या लष्कराचे कर्तव्यच आहे. पाकिस्तानी लष्कराप्रमाणे घुसखोरी करणे हा आमच्या लष्कराचा पुरुषार्थ नाही. देशाच्या संसदेने केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्याचा आदेश लष्करप्रमुखांनी मागितला आहे. केंद्र सरकारने आता माघार घेऊ नये. तुकडे तुकडे गँगला धडा शिकवण्याचा हाच उत्तम मार्ग आहे! असे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

Protected Content