मुंबई प्रतिनिधी | सध्या आरोपांच्या भोवर्यात अडकलेले एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन एक यंत्रणा समीर यांच्या विरोधात काम करत असल्याचा आरोप केला आहे.
समीर वानखेडे यांच्यावरील आरोपांना आज क्रांती रेडकरने पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. त्या म्हणाल्या की, होय त्यांच्याविरोधात एक विशेष यंत्रणा काम करत आहे. पण मला खात्री आहे महाराष्ट्र सरकार खूप समजदार आहे. महाराष्ट्र सरकार सहकार्य करणारं आहे. विजय सत्याचाच होईल, असं काम महाराष्ट्र सरकार करेल. राज्य सरकार जरुर समीर वानखेडे यांच्यापाठीमागे खंबीरपणे उभा राहिल ज्यावेळी त्यांना सत्य कळेल. भाजपच्या सांगण्यानुसार समीर वानखेडे कारवाई करतात, त्यानुसार त्यांच्या कारवाईची दिशा ठरते, असा आरोप समीर वानखेडे यांच्यावर केला जातोय. या प्रश्नाला उत्तर देताना क्रांती रेडकर म्हणाली, या आरोपात कोणतंही तथ्य नाही. ते कोणत्याही पक्षासाठी काम करत नाहीत, ते न्यूट्रल आहेत. ते खूप प्रामाणिक ऑफिसर आहेत.
क्रांती रेडेकर पुढे म्हणाल्या की, समीर वानखेडे फक्त कलाकारांना पकडत नाहीत, ते फक्त दोन-तीन टक्के आहेत. उरलेले ड्रग्ज पेडलर आणि त्यासंबंधी आहेत. त्यामुळे जे आरोप करतायत त्यांच्या आरोपांमध्ये कोणतंही तथ्य नाही. या प्रकरणी न्यायालयीन चौकशीत सत्य समोर येणार असल्याचेही त्या म्हणाल्या.