मुंबई प्रतिनिधी | समीर वानखेडे यांनी मुस्लीम पध्दतीत डॉ. शबाना यांच्याशी विवाह केला होता, त्यांचे नाव समीर दाऊद वानखेडे असल्यानेच आपण हा विवाह लाऊन दिला असून नवाब मलीक यांनी सादर केलेला निकाहनामा खरा असल्याचा दावा मौलाना मुजम्मील अहमद यांनी केला आहे.
समीर वानखेडे यांचे खरे नाव समीर दाऊद वानखेडे असून त्यांनी मुस्लीम धर्मियांच्या विधीनुसार डॉ. शबाना यांच्याशी विवाह केला होता असे आधी सांगणारे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलीक यांनी आज वानखेडेंच्या विवाहाचा निकाहनामा ट्विट केल्याने खळबळ उडाली आहे. यानंतर टिव्ही नाईन या वाहिनीने संबंधीत निकाहनाम्यावर स्वाक्षरी असणारे मौलाना मुजम्मील अहमद यांच्याशी वार्तालाप केला असता त्यांनी हा निकाहनामा खरा असल्याचे सांगितले.
मौलाना म्हणाले की, निकाहावेळी समीर यांनी दाऊद असंच नाव घेतलं होतं. आम्ही मुलाला त्याचं पूर्ण नाव सांगायला सांगतो, तसंच तुमचा निकाह शबाना यांच्यासोबत एवढ्या महरवर करत आहोत, तुम्हाला हे मान्य आहे? तेव्हा मुलगा म्हणते मान्य आहे. त्यानंतर स्वाक्षरी केली जाते. महरच्या समोरही स्वाक्षरी केली जाते. निकाह लावणारा काझीही त्यावर स्वाक्षरी करतो. तिथे उपस्थित असलेले साक्षीदारही आपली स्वाक्षरी करतात. निकाहवेळी समीर वानखेडे यांनी आपल्या वडिलांचं नाव दाऊद असंच सांगितलं होतं. त्यावेळी ते दाऊदच बनले होते. त्यापूर्वी किंवा त्यानंतर त्यांचं नाव काय असेल ते आम्हाला काय माहिती, असंही मौलाना म्हणाले.
दरम्यान, मुलगा-मुलगी ज्यावेळेस निकाहसाठी येतात. त्यावेळेस त्यांच्याकडून फॉर्म भरुन घेतला जातो. त्यात बघितलं जातं की मुलगा मुसलमान आहे की नाही, त्याचा बाप मुसलमान आहे की नाही, नंतरच निकाह केला जातो. आधीच माहिती घेतली जात नाही. माहिती तर त्यानं घ्यायची असते ज्याला आपल्या मुलीचा निकाह करायचा आहे. आम्ही एवढच बघतो की मुलगा-मुलगी मुसलमान आहेत की नाही, आणि ते असतील तर ते राजी असतील तर निकाह केला जातो, असे मुजम्मिल अहमद यांनी सांगितले.