जळगाव प्रतिनिधी । संभाजी नगरात एका प्राध्यापकाच्या बंद घरातून अज्ञात चोरट्यांनी दीड लाखाचे दागिने लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला असून याबाबत रामानंद नगर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, सदाशिव गणपतराव डापके (35, मुळ रा.लिहाखेडी, ता.सिल्लोड, जि.जळगाव) हे मेहरुणमधील इकरा एच.जे.थीम महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरीला आहेत. संभाजी नगरातील राकेश नगरात प्रभाकर रुपचंद गांगवे यांच्या मालकीच्या घरात भाड्याने पत्नी भाग्यश्री, मुलगा ऋषीकेश, मुलगी ऋतुश्री अशांसह वास्तव्याला आहेत. बुधवारी ते घराला कुलुप लावून पत्नी व मुलांसह कारने मुळ गावी गेले होते.
गुरुवारी सकाळी घरमालक प्रभाकर गांगवे यांनी फोन करुन घर उघडे व कडीकोयंडा तुटलेला असल्याचे सांगितले. घरात पाहणी केल्यावर कपाट उघडे होते व साहित्याची नासधूस केलेली होती. ही माहिती मिळाल्यानंतर प्रा.डापके तातडीने दुपारी घरी दाखल झाले. कपाटात ठेवलेले दागिने तपासले असता गायब झालेले होते. दीड लाख रुपये किमतीचे सहा तोळे दागिने लांबविण्यात आले आहेत. त्यात अंगठ्या, सोनसाखळी, मनी मंगळसूत्र, वेढा, पदक, नथ, मोरणी यांचा समावेश आहे. डापके यांनी गावाला जाताना पंधरा ग्रॅमच्या दोन अंगठ्या हातात घातल्या होत्या, त्यामुळे या अंगठ्या सुरक्षित राहिल्या. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यनंतर रामानंद नगर पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी रात्री घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.