Home राज्य साताऱ्यात होणाऱ्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी संभाजी भगत

साताऱ्यात होणाऱ्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी संभाजी भगत


सातारा-वृत्तसेवा | सातारा येथे येत्या २ व ३ मे रोजी १५ वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन आयोजित करण्यात येणार असून या संमेलनाच्या अध्यक्षपदी ख्यातनाम शाहीर, गायक आणि विद्रोही शाहिरी जलस्याचे प्रवर्तक शाहीर संभाजी भगत यांची निवड करण्यात आली आहे. ही माहिती राहुरी येथे झालेल्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाचे अध्यक्ष डॉ. बाबुराव गुरव आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्राचे अध्यक्ष कॉ. धनाजी गुरव यांनी साताऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेला एड. सुभाष पाटील, संमेलन संयोजन समितीचे अध्यक्ष व सहस्वागताध्यक्ष हभप डॉ. सुहास महाराज फडतरे, कार्याध्यक्ष कॉ. विजय मांडके, सरचिटणीस एड. राजेंद्र गलांडे, प्रा. गौतम काटकर आदी उपस्थित होते. क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त हे संमेलन साताऱ्यात आयोजित करण्यात येत आहे.

शाहीर संभाजी भगत हे सातारा जिल्ह्यातील पांचगणी जवळील महू गावचे रहिवासी आहेत. लहानपणापासूनच त्यांनी गावातील कुणबी व मातंग समाजातील कलावंतांची गायकी ऐकत आपली कलात्मक जडणघडण केली. भजन व भारुडांच्या परंपरेतून त्यांची कला फुलली. पुढे मुंबईत जाऊन ते डाव्या चळवळीशी जोडले गेले आणि त्यांनी गावाकडच्या कलासंस्कृतीला आधुनिक अभिव्यक्ती दिली.

संभाजी भगत यांनी अनेक पोवाडे सादर केले असून ‘कोर्ट’ या राष्ट्रपती सुवर्णकमळ पुरस्कारप्राप्त चित्रपटातील गाणे त्यांनी गायले आहे. ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकामुळे त्यांना विशेष ओळख मिळाली. या नाटकाची संकल्पना, गीते व संगीतही त्यांचेच आहे. पहिल्या विद्रोही साहित्य संमेलनात त्यांनी सादर केलेले ‘हे पालखीचे भोई, आईची ओळख नाही’ हे गीत विशेष गाजले होते. शाहीर विलास घोगरे यांच्यासह त्यांनी अनेक पथनाट्ये व शाहिरी कार्यक्रम केले आहेत.

संभाजी भगत यांचे ‘अडगळ’ हे नाटक, ‘कातळाखालचे पाणी’ आत्मचरित्र, ‘तोड ही चाकोरी’ गाण्यांचा संग्रह, ‘रणहलगी’ लेखसंग्रह तसेच ‘उंदीर नावाचे भारुड’ आणि ‘गिरणीचा वग’ ही मुक्तनाट्ये प्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘सरपंच भगिरथ’ आणि ‘नागरिक’ या चित्रपटांना संगीत दिले असून ‘फनरल’ आणि ‘तुझ्या आईला’ या चित्रपटांत अभिनयही केला आहे. अस्मितादर्श, मिफ्ता, प्रबोधन मित्र आणि संत तुकाराम पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

ते नुकतेच १४ देशांच्या दौऱ्यावर जाऊन विविध विद्यापीठांत पर्यायी सांस्कृतिक राजकारणावर व्याख्याने देऊन आले आहेत. लोककलेच्या माध्यमातून सामाजिक व राजकीय वास्तव मांडणारा शाहीर म्हणून त्यांचे स्थान वादातीत असल्याचे एड. सुभाष पाटील यांनी सांगितले.

सातारामध्ये यापूर्वी २००२ मध्ये चौथे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन झाले होते. त्या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत डॉ. बाबा आढाव होते. तब्बल २२ वर्षांनंतर पुन्हा एकदा साताऱ्यात हे संमेलन होत आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र आणि संमेलन संयोजन समिती, सातारा यांच्या वतीने लवकरच कार्यक्रम पत्रिका जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. सुहास महाराज फडतरे यांनी दिली.


Protected Content

Play sound