जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून येत्या १४ एप्रिल रोजी जळगाव जिल्ह्यात संपूर्ण दिवस मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी निर्गमित केले आहेत. पोलीस अधीक्षकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने केलेल्या विनंतीचा विचार करून प्रशासनाकडून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ मधील कलम १४२ (१) अंतर्गत मिळालेल्या विशेष अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश लागू केले आहेत. या आदेशानुसार, जिल्ह्यातील सर्व प्रकारची देशी व विदेशी मद्यविक्री दुकाने, परमिट रूम, बिअर शॉपी आणि ताडी दुकाने यांसह सर्व किरकोळ मद्यविक्री केंद्र पूर्णपणे बंद राहतील.
जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, १४ एप्रिल रोजी या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही अनुज्ञप्तीधारकावर महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सार्वजनिक शांतता आणि उत्सवाचे पावित्र्य जपण्यासाठी सर्व संबंधितांनी या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.




