मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । 1400 किलोमीटरचा 61 दिवसाचा पायी प्रवास करत विठूरायाचे दर्शन घेवून महाराष्ट्रातील मानाच्या आषाढी वारी संत मुक्ताई पालखी सोहळ्याचे स्वगृही आगमन झाले.
त्यानिमित्ताने दि. 1 ऑगस्ट रोजी पालखी सोहळ्याचे आगमन स्वागत प्रसंगी भव्य वारकरी सांप्रदायिक दिंडी स्पर्धेच्या उत्साहात तसेच टाळ, मृदुंगाचा गजर, नाम घोष चिंतनाने अवघे मुक्ताईनगर न्हाऊन निघाले होते. पंचक्रोशीतील ग्रामस्थ व आगमन सोहळा स्वागत समितीचे वतीने शहरात आकर्षक सजावट भगवे ध्वज, केळीचे खांब लावून मिरवणूक मार्गावर चैत्यन्यदायी सजावट करून तसेच श्री स्वामी समर्थ सेवेकरी परिवारातर्फे पूर्ण मार्गावर रांगोळ्या काढून अद्भुतपर्व स्वागत करण्यात आले. ‘न भूतो न भविष्यति’ असा सोहळा येथे पार पडला.
312 वर्षापासून अखंडित जाणारा आषाढी वारी संत मुक्ताबाई पालखी सोहळा संत मुक्ताई समाधीस्थळ तिर्थक्षेत्र – मुक्ताईनगर ते पंढरपूर परत मुक्ताईनगर जात येत असतो. परतवारी आगमनाचे स्वागत तिर्थभूमी मुक्ताईनगर येथे नागरिक भाविकांकडून शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. कोरोनामुळे मागील दोन वर्षांत सोहळा साजरा करता आला नाही. यंदा पहिल्या श्रावण सोमवारी पालखी आगमन होत असल्याने भाविकांत प्रचंड उत्साह दिसून आला. तसेच शहर सडारांगोळी, ध्वजपताका, तोरणे, कमानी लावून सजविण्यात आले होते..
दिंडी स्पर्धेत 55 भजनी मंडळांनी सहभाग नोंदवला. यात बाल, महिला, पुरूष गटांचा समावेश आहे. त्यासाठी स्वतंत्र बक्षीस ठेवण्यात आली होती.
सकाळी 10 वाजता प्रत्यक्ष नवे मंदिर येथे मान्यवरांच्या हस्ते पालखी पूजन होवून दिंडी मिरवणूक स्पर्धेस आरंभ करण्यात आला .विसावा पादूका, मुक्ताई चौक, बस स्टन्ड, परिवर्तन चौक, भुसावळ रोड, गजानन महाराज मंदिर मार्गे, कोथळी मुळ मंदिरात पालखी सोहळा आल्यानंतर येथे दिंडी चालक पालखी सोहळा प्रमुख हभप. रविंद्र महाराज हरणे यांचे काल्याचे कीर्तन संपन्न झाले.यानंतर उत्कृष्ट पथसंचलन व वारकरी संस्कृतीचे सादरीकरण करून पारितोषिक पटकाविणाऱ्या दिंड्याना बक्षीस वितरण करण्यात आले.
मुक्ताईनगर शहर, कोथळी,सालबर्डी गावातून 1 लाखाच्या वर महिला भाविकांनी केलेल्या पोळ्या महाप्रसाद करीता गोळा करण्यात आल्या, तर दात्याकडून साहित्य देणगीतून शिरा, भात, गंगाफळ भाजी असा सुमारे 20 हजार संख्येतील भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. महाप्रसाद वाटपासाठी कोथळी, सालबर्डी मुक्ताईनगर ग्रामस्थ व भाविकांनी प्रचंड मेहनत घेतली.
आमदार चंद्रकांत पाटील व शिवसेना परीवरकडून चौकात स्वागत :
आदिशक्ती मुक्ताई पालखी सोहळ्यात स्पर्धेत सहभागी प्रत्येक दिंडीतील विणेकरी यांच्यासाठी मुक्ताई प्रतिमा, शाल, रुमाल, भगवी टोपी, साडी चोळी , पुष्प हार, बंद लिफाफ्यात (गुप्त मदत) भेट देण्यात आली. आदिशक्ती मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख व संत मुक्ताई संस्थान अध्यक्ष तसेच वारकऱ्यांचा मानाची घोंगडी ,मुक्ताई प्रतिमा देवून सत्कार करण्यात आला. आमदार पाटील यांनी पालखी सोहळ्याच्या रथ संचालन करणाऱ्या बैल जोडीचे पूजन देखील केले. यावेळी आमदार पाटील हे पूर्ण कुटुंबासहीत उपस्थित होते तसेच त्यांचेसह समस्थ पदाधिकारी , मुक्ताईनगर व बोदवड येथील नगरसेवक कार्यकर्ते महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
त्यासह विविध राजकीय पक्षांतर्फे , सामाजिक संघटना, व्यावसायिक व भाविकांतर्फे पालखी मिरवणूक मार्गावर ठीक ठिकाणी चहा , नाश्ता, फराळ, फळे, बिस्कीट , पाणी , दूध वाटप करण्यात आले.
श्रीसंत मुक्ताबाई पालखी आगमन सोहळा
वारकरी सांप्रदायिक दिंडी स्पर्धा विजेते –
बालगट –
बालगट प्रथम बक्षिस –
श्री मच्छिंद्रनाथ बाल भजनी मंडळ, वडोदा पानाचे, ता.मुक्ताईनगर
बालगट द्वितीय बक्षिस
चैतन्य कानिफनाथ बाल भजनी मंडळ, खिरवड, ता.रावेर
बालगट तृतीय बक्षिस
संत मुक्ताबाई बालिका भजन मंडळ, म्हैसवाडी ता.मलकापूर
महिलागट –
महिलागट प्रथम बक्षिस
श्री वियोगी भजन महिला मंडळ, पलसोडा ता.नांदुरा
महिलागट द्वितीय बक्षिस
आदिशक्ती मुक्ताई महिला भजनी मंडळ, उमरा पानाचे ता. संग्रामपूर
महिलागट तृतीय बक्षिस
मुक्ताबाई भजनी मंडळ, पिंप्रीआकाराऊत ता. मुक्ताईनगर
पुरूषगट
पुरूषगट प्रथम
श्रीलक्ष्मीनारायण भजनी मंडळी, लोणी ता.बुऱ्हाणपूर
द्वितीय
श्री हनुमान भजनी मंडळ, लोणी ता. जामनेर
तृतीय
जय हनुमान भजनी मंडळ, दोधे ता. रावेर
परिक्षक म्हणून यांनी काम पाहिले –
1) गजानन महाराज गायकवाड बुलढाणा
2) अमोल महाराज पाटील कासली
3) कृष्णा गुरूजी मुक्ताईनगर
4) भाऊराव महाराज पाटील