मुंबई – वृत्तसेवा । अभिनेता सैफ अली खान यांच्यावर चाकूने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली असून त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटना त्यांच्या खार येथील फॉर्च्यून हाइट्स या निवासस्थानी १६ जानेवारी रोजी पहाटे ३ वाजता घडली.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, सैफ अली खान यांच्या घरात चोर शिरला होता. या वेळी काही घरातील नोकर जागे झाले आणि त्यांनी आरडाओरड सुरू केली. आवाज ऐकून सैफदेखील जागे झाले आणि त्यांनी चोराला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोराने चाकूने हल्ला करत सैफ यांना जखमी केले. सैफ यांना तत्काळ घरातील सदस्य आणि नोकरांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने, त्यांची दुखापत गंभीर नसल्याचे समोर आले आहे.
सैफ अली खान यांची पत्नी आणि अभिनेत्री करीना कपूर खान आणि त्यांची मुलं सुरक्षित आहेत. या घटनेबाबत सैफ यांच्या कुटुंबाने अद्याप कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. चोरीच्या प्रयत्नानंतर चोर घटनास्थळावरून फरार झाला आहे. मुंबई पोलिस आणि क्राइम ब्रांचचे पथक आरोपीला पकडण्यासाठी प्रयत्नशील आहे. सैफ यांच्या घराजवळील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत आहे.
ही घटना उघडकीस आल्यानंतर सैफ अली खान यांच्या घरातील सुरक्षा यंत्रणा आणि व्यवस्थांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घटनेनंतर त्यांच्या घराच्या परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
या घटनेनंतर सैफ अली खान यांच्या चाहत्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावर त्यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सैफ अली खान यांच्यावर झालेल्या या हल्ल्यानंतर पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा आता या घटनेचा बारकाईने तपास करत आहेत. या प्रकाराने सेलिब्रिटींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.