
अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील साई इंग्लिश अकॅडमीतर्फे आयोजित विविध शैक्षणिक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार आणि प्रतिष्ठेचा ‘साई रत्न’ पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. एम. जे. हॉल येथे आयोजित या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक तसेच मान्यवरांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली होती. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा हा सोहळा प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संदीप घोरपडे होते, तर भाऊसाहेब देशमुख आणि प्रतिभा मगर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मेहनत, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या बळावर शैक्षणिक क्षेत्रात यश मिळवण्याचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात मृणल पाटील, कल्याणी पाटील आणि विष्णू सोनवणे यांनी आपल्या यशस्वी प्रवासाबाबत मनोगत व्यक्त केले. पालक प्रतिनिधी म्हणून शीतल मोरे आणि नितीन भदाणे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करत अकॅडमीच्या उपक्रमांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
या सोहळ्यात विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १३३ हून अधिक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यंदाचा अत्यंत प्रतिष्ठेचा आणि प्रेरणादायी ‘साई रत्न’ पुरस्कार कल्याणी संदीप पाटील, गार्गी सुनील जोशी, घनिका प्रशांत मालुसरे आणि लिनाली प्रमोद ठाकरे या चार विद्यार्थिनींना प्रदान करण्यात आला. या विद्यार्थिनींच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळे त्यांना हा मानाचा पुरस्कार मिळाल्याचे सांगण्यात आले.
तसेच शाळेत सातत्याने प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या नेहा राकेश पाटील हिला विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तिच्या उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीबद्दल उपस्थित मान्यवरांनी तिचे कौतुक केले आणि भविष्यातही अशीच प्रगती करत राहण्याचा सल्ला दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक साई इंग्लिश अकॅडमिचे संचालक भैय्यासाहेब मगर यांनी केले. त्यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारे पुढे जाण्यासाठी प्रेरित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका बारी हिने उत्कृष्टरीत्या केले, तर आभार प्रदर्शन रीचल पाटील हिने केले.



