Home Cities यावल यावल पालिकेत शिवसेना उबाठा गटनेतेपदी सागर चौधरी तर उपगटनेतेपदी वैशाली बारी यांची...

यावल पालिकेत शिवसेना उबाठा गटनेतेपदी सागर चौधरी तर उपगटनेतेपदी वैशाली बारी यांची निवड


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असून, महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासह दोन नगरसेवकांनी दणदणीत विजय मिळवलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सत्ताधारी गट स्थापन केला आहे. शिवसेना व अपक्ष नगरसेवकांच्या संयुक्त गटात गटनेतेपदी सागरकुमार सुनील चौधरी तर उपगटनेतेपदी वैशाली निलेश बारी यांची निवड करण्यात आली आहे.

यावल नगरपालिकेत शिवसेना उबाठा व अपक्ष नगरसेवक मिळून स्थापन करण्यात आलेल्या या सत्ताधारी गटाची अधिकृत नोंदणी जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे करण्यात आली आहे. या वेळी नूतन नगराध्यक्ष सौ. छाया अतुल पाटील यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक सागरकुमार सुनील चौधरी, नगरसेविका सौ. वैशाली निलेश बारी तसेच अपक्ष नगरसेवक पराग विजय सराफ हे उपस्थित होते. या चार सदस्यांच्या गटास अधिकृत मान्यता देण्यात आली आहे.

सदर सत्ताधारी गटामध्ये शिवसेना उबाठाच्या सौ. छाया अतुल पाटील, सागर सुनील चौधरी, सौ. वैशाली निलेश बारी आणि अपक्ष नगरसेवक पराग विजय सराफ यांचा समावेश असून, नगरपालिकेतील कारभार अधिक गतिमान व लोकाभिमुख पद्धतीने राबवण्याचा निर्धार या माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे. शहराच्या विकासकामांना प्राधान्य देत नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही संकेत देण्यात आले आहेत.

गटनेते व उपगटनेतेपदी झालेल्या निवडीचे माजी नगराध्यक्ष अतुल वसंत पाटील, शिवसेना उबाठाचे जिल्हा उपप्रमुख गोपाळ चौधरी, यावल तालुका प्रमुख शरद कोळी, माजी तालुकाप्रमुख कडू पाटील, शहर प्रमुख जगदीश कवडीवाले यांच्यासह संतोष खर्चे, पप्पु जोशी, गोलु माळी, मनोज करनकर, सारंग बेहडे, योगेश चौधरी, मयुर खर्चे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे.

या निवडीमुळे यावल नगरपालिकेत शिवसेना उबाठाची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत झाल्याचे चित्र असून, महाविकास आघाडीच्या सहकार्यातून स्थापन झालेला हा सत्ताधारी गट आगामी काळात शहराच्या विकासासाठी प्रभावी निर्णय घेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound