पारोळा, प्रतिनिधी | तालुक्यातील मौजे सोधे येथे गावातील एक शेतकरी दयाराम रुपचंद पाटील यांच्या शेतातील विहिरीत आज (दि.१६) सकाळी एक नर बिबट्या पडल्याची घटना उघडकीस आली. ही बातमी कळल्यानंतर येथील वनक्षेत्रपाल व क्षेत्रीय कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन बिबट्याला काढण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीने क्रेनच्या सहाय्याने विहिरीत पिंजरा सोडून त्याला सुरक्षित वर काढले.
विहिरीतून बाहेर काढल्यावर बिबट्याला पारोळा येथील पशु वैद्यकिय अधिकारी डॉ. ए.डी. पाटील, एम.जे. तळकर व एन.एम. गाडीलकर यांचेकडुन त्याची तपासणी करण्यात आली. हा बिबट्या सुमारे चार वर्षांचा असून तो नर जातीचा आहे. तसेच शारीरिकरित्या तंदुरुस्त असल्याचे समजल्यानुसार त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात वरीष्ठांच्या आदेशाने रात्रीच्या वेळी नेवून मुक्त करण्यात येणार आहे. या कार्यवाहीसाठी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी आर.एस. दसरे, जळगाव येथील फिरत्या पथकाचे वनक्षेत्रपाल राजेंद्र राणे, वनपाल एम.बी.बोरसे, वनरक्षक बी.एन. पाटील, व्ही.एच. शिसोदे व पी.पी. पाटील तसेच अन्य कर्मचारी यांनी सदर परिश्रम घेतले.