भुसावळ प्रतिनिधी । मुले चोरीच्या संशयातून भुसावळातल्या जुना सातारा परिसरात सायंकाळी तीन साधूंना मारहाण करण्यात आली. मात्र पोलिसांनी केलेल्या चौकशीत असला कोणताही प्रकार नसल्याचे लक्षात आल्याने त्यांना त्यांच्या गावी रवाना करण्यात आले.
याबाबत वृत्त असे की, शहरातील जुना सातारा परिसरात सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास तीन साधू संशयास्पदरित्या फिरत असल्याचे दिसून आले. यामुळे हे साधू मुले चोरी करण्यासाठी आल्याच्या संशयातून नागरिकांना त्यांना बेदम मारहाण केली. दरम्यान, या ठिकाणी पोलीस दाखल झाले. शहर पोलीस स्थानकाचे निरिक्षक बाळासाहेब ठुबे यांनी साधूंची चौकशी केली. यात ते तिन्ही जण मध्यप्रदेशातील एका गावात रहिवासी असल्याचे सांगितले. ठुबे यांनी संबंधीत गावातील पोलीसांशी संपर्क साधून त्यांची खातरजमा केली. यात ते साधून संबंधीत गावातील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे या तिन्ही साधूंना पोलीस बंदोबस्तामध्ये रेल्वेने त्यांच्या गावी पाठविण्यात आले. दरम्यान, या प्रकारामुळे जुना सातारा परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.