Home धर्म-समाज शेगावात सद्गुरू शिवकृपानंद स्वामींचे मोठे विधान 

शेगावात सद्गुरू शिवकृपानंद स्वामींचे मोठे विधान 


शेगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्यात वाढत्या भोंदूगिरीच्या पार्श्वभूमीवर अध्यात्मिक क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी गुरूंना ‘ऑरा’ तपासणी करून अधिकृत परवाना देण्याची गरज असल्याचे महत्त्वपूर्ण विधान सद्गुरू शिवकृपानंद स्वामी यांनी शेगाव येथे केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे अध्यात्मिक वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

शेगाव येथील स्व. गजाननदादा पाटील मार्केट यार्ड (कॉटन मार्केट) मैदानावर आयोजित हिमालयीन समर्पण ध्यानयोग शिबिरात स्वामीजींनी सुमारे १५ हजार भाविकांना मार्गदर्शन केले. या वेळी त्यांनी ‘गुरू ही व्यक्ती नसून एक शक्ती आहे, एक कल्याणकारी तत्व आहे’ यावर विशेष भर दिला. अध्यात्मिक साधनेत गुरूचे स्थान किती महत्त्वाचे आहे, हे स्पष्ट करत त्यांनी भक्तांना आत्मपरीक्षण आणि साधनेचे महत्त्व पटवून दिले.

प्रवचनादरम्यान त्यांनी राज्य शासनाकडे एक आगळीवेगळी मागणी मांडली. भोंदू बाबांमुळे अनेक भक्तांची फसवणूक होत असल्याने अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी अध्यात्मिक गुरूंची ‘ऑरा’ म्हणजेच आभामंडळ तपासणी केली जावी. त्यानंतर पात्र ठरलेल्या गुरूंना पाच वर्षांसाठी अधिकृत सरकारी परवाना देण्यात यावा आणि पुन्हा पाच वर्षांनंतर त्यांची तपासणी करून परवाना नूतनीकरण करावे, असे त्यांनी सुचवले. जर तपासणीत योग्य स्थिती आढळली नाही, तर संबंधित गुरूंना कार्य थांबवण्याचा सल्ला द्यावा, असेही त्यांनी नमूद केले.

स्वामीजींनी सांगितले की, या प्रक्रियेमुळे गुरूंनाही स्वतःच्या आध्यात्मिक स्थितीची जाणीव होईल आणि भोंदूगिरीला मोठ्या प्रमाणात आळा बसेल. हा उपक्रम गुरू आणि त्यांच्या अनुयायांसाठी सुरक्षित व पारदर्शक ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले. सध्याच्या राज्यातील परिस्थिती लक्षात घेता ही संकल्पना उपयुक्त ठरू शकते, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

या शिबिरात देश-विदेशातील साधकांनी सहभाग घेतला होता. जर्मनीहून आलेल्या लीना या महिला साधकाने आपल्या अनुभवांबाबत सांगताना, शिबिरात सहभागी झाल्यानंतर अत्यंत प्रसन्न वाटत असल्याचे नमूद केले. स्वामीजींनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार आपण साधना करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शेगाव शहरातील स्वच्छता व शिस्त पाहून आपण प्रभावित झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.


Protected Content

Play sound