वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वरणगाव नगरपरिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचा निर्णय घेत वरणगाव शहराध्यक्षपदी सचिन (पप्पू) निवृत्ती माळी यांची नियुक्ती केली आहे. स्थानिक राजकीय समीकरणे आणि आगामी निवडणुकांचा विचार करता ही नियुक्ती भाजपासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वरणगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपाला २१ पैकी १४ जागांवर विजय मिळवत बहुमत प्राप्त झाले असले, तरी गटबाजीमुळे नगराध्यक्षपदावर पराभव स्वीकारावा लागला. पक्षांतर्गत मतभेद, बंडखोरी आणि स्थानिक स्तरावरील असमतोल याचा थेट परिणाम नगराध्यक्ष निवडीवर झाल्याचे स्पष्ट झाले. निवडणूक निकालानंतर पक्ष नेतृत्वाने सखोल आढावा घेत संघटना नव्याने बांधण्याचा निर्णय घेतला.

या निवडणुकीत झालेल्या पराभवाचे विश्लेषण करताना शहरातील माळी समाज पक्षापासून काहीसा दुरावल्याचे लक्षात आले. याच पार्श्वभूमीवर समाजातील प्रभावी नेतृत्वाला संधी देत पुन्हा एकदा विश्वासाचे नाते निर्माण करण्याच्या उद्देशाने सचिन (पप्पू) माळी यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा चांगला जनसंपर्क असून, संघटनात्मक कामाचा अनुभवही त्यांच्या पाठीशी आहे.
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, भाजप जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांच्या मार्गदर्शनानुसार आणि आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे ध्येय-धोरण घराघरात पोहोचवणे, कार्यकर्त्यांना एकत्रित करणे आणि आगामी महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी पक्ष मजबूत करण्याची जबाबदारी नवनियुक्त शहराध्यक्षांवर सोपवण्यात आली आहे.
शहराध्यक्षपदाच्या नियुक्ती पत्रात तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी पक्षाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी अविरत प्रयत्न करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच आमदार अमोल जावळे, भाजप जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी नवनियुक्त शहराध्यक्ष सचिन (पप्पू) माळी यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
एकूणच, वरणगावमध्ये भाजप संघटनात्मक पातळीवर नव्याने बांधणी करण्याच्या दिशेने ही नियुक्ती महत्त्वाची ठरणार असून, आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला याचा सकारात्मक लाभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



