जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आपले शहर स्वच्छ, सुंदर आणि हिरवेगार राहावे यासाठी अहोरात्र परिश्रम करणाऱ्या स्वच्छता दूत आणि आरोग्य कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जळगाव येथील एस.डी. फाऊंडेशनतर्फे विशेष कृतज्ञता भोज व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. जळगाव शहर महानगरपालिका आणि पर्यावरण दूत यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ‘माझे शहर, माझी जबाबदारी’ या अभियानांतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमात शहरातील स्वच्छता दूत आणि आरोग्य कर्मचारी यांचा सन्मान करून त्यांना भोजन देण्यात आले. स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता कचरा संकलन, स्वच्छता आणि आरोग्य सेवा पुरवून शहरवासीयांचे आरोग्य जपणाऱ्या या कर्मचाऱ्यांप्रती समाजाने कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक असल्याची भावना एस.डी. फाऊंडेशनचे सचिव सुहास दुसाने यांनी व्यक्त केली. हे कर्मचारीही आपल्यातीलच असून त्यांच्या कामामुळेच शहर सुरक्षित आणि स्वच्छ राहते, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात सांस्कृतिक रंगतही पाहायला मिळाली. अमोल ठाकुर यांनी सादर केलेल्या जळगाव गीताने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले, तर आरोग्य कर्मचाऱ्यांनीही गीत सादर करून आपल्यातील कलावंत सर्वांसमोर आणला. यावेळी विशाल पाटील आणि रमेश कांबळे यांनी प्रबोधन करत स्वच्छता आणि आरोग्याबाबत जनजागृतीचे महत्त्व अधोरेखित केले. अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले.
मुख्य स्वच्छ निरीक्षक रमेश कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने स्वच्छता दूत आणि आरोग्य दूत या कार्यक्रमाला उपस्थित होते. सर्व उपस्थित कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या वेळी शहराचे लाडके आमदार राजू मामा भोळे, डॉ. सुनील सूर्यवंशी, डॉ. श्रीराज महाजन, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य सुहास गाजरे, डॉ. हेमंत पाटील, डॉ. रेणुका चव्हाण, समुपदेशिका भारती कुमावत, डॉ. पंकज पाटील, संजय विसपुते, विजय वानखेडे, संजय पगार, प्रशांत विसपुते, पर्यावरण दूत विशाल पाटील, संतोष आहुजा, प्राजक्ता चौधरी, मंगेश सोनार, हितेंद्र टेकावडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
एस.डी. फाऊंडेशनतर्फे सुधाकर दुसाने, चेतन दुसाने, प्रभुदत्त दुसाने, जतिन इंगळे, लोकेश भालेराव, भाग्यश्री दुसाने, दिशा ठाकुर, वैशाली नारखेडे, प्रियंका कुलकर्णी, माया पाटील, पूजा काबरा, प्रियंका पाटील, सुषमा इंदुरकर, तृप्ती दोषी, विद्या श्रीवास्तव, संगिता सोनवणे यांच्यासह अनेक नागरिकांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगदान दिले.



