चोपडा प्रतिनिधी । सरकारने भूलथापा दिल्या तरी शेतकरी संघटना या बळीराजाला वार्यावर सोडणार नसल्याचे प्रतिपादन एस.बी. पाटील यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर, शेतकरी नेते एस.बी. नाना पाटील यांनी एका पत्रकान्वये आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, आज देशात सर्वपक्षीय सरकार सत्तेत येते की काय झाले व काल पर्यन्त शेतकर्यांच्या प्रश्नावर घसा कोरडा पडे पर्यन्त भाषण देणारे नेते सरकारी पक्षात जमा होत आहेत. यामुळे एका रात्रीत देशातील शेतकरी कोट्याधीश झाले की काय असा सार्यांना भ्रम झाला.राजकीय पटलांवर काहीही झाले तरी शेतकरी संघटनांचे जागल्याचे काम सार्या संघटना करीतच राहणार.त्यामुळे शेतकर्यांनी घाबरण्याचे कारण नाही. गेल्या पाच वर्षातील राज्यभर दुष्काळ व यावर्षी काही भागात दुष्काळ तर काही भागात अतिवृष्टीमुळे पूर यामुळे शेतकर्यांना यावर्षी देखील आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागणार आहे यात शंका नाही.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, आगामी निवडणुकांच्या काळात शेतकर्यांच्या मुलांना पुन्हा एकदा काहीतरी आश्वासन दिले जाईल व ते देखील त्याला बळी पडू शकतात. त्या सुज्ञांना विनंती आहे की विचार करा ,गेल्या काही वर्षात कोणत्याही विभागात नोकर भरती झालेल्या नाहीत,मेगा भरती खोटया आहेत. मंदीने काहींच्या नोकर्या गेल्यात तर काही कमी पगारा वर काम करीत आहेत. कलम ३७०हटवल्याने काही काश्मिरात व्यवसायाला गेले असतील पण ते आम्हाला माहित नाही, पक्षांतर केल्याने फक्त पुढार्याच्या मुलांचे पुनर्वसन झाले असल्याचे ऐकीवात आहे.
यात पुढे म्हटले आहे की, भविष्य घडवायचे असल्यास शेती एके शेती व शेती दुणे शेती हाच एकमेव शाश्वत मार्ग आहे. त्यासाठी शेतीतील धोके टाळण्यासाठी (१)नैसर्गिक तोटे झाल्यास कायदेशीर(फसवा नाही) पीकविमा मिळावा यासाठी अस्तित्वातील कायद्यातील त्रुटी दूर होणे साठी लढा द्या.
(२)दुष्काळ अथवा इतर अपघात झाल्यास(जसा आता पूर आला) तात्काळ मदत मिळणेसाठीची राष्ट्रीय आपद्ग्रस्त योजना( डिझास्टर मॅनेजमेंट) सक्षम व्हावी.
(३)बाजारपेठेत भाव पडल्यास खरी किमान आधारभूत किंमत(सध्याची लबाड सिस्टीम नाही) मिळणेसाठी भावांतर योजना राबवावी. हे सारे झाल्यास तुमचे भविष्य उज्ज्वल आहे.यासाठी तुमच्या भागातील योग्य शेतकरी प्रतिनिधी निवडा. शेतकरी संघटना ह्या तुमच्या सोबत असल्याची ग्वाही या पत्रकात देण्यात आलेली आहे.