जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कत्तलीच्या उद्देशाने गोवंश जातीच्या जनावरांची अत्यंत क्रूरपणे वाहतूक करणारा पिकअप जामनेर पोलिसांनी पकडला आहे. जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर नेरी बुद्रुकजवळ ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी पाच बैल आणि दोन गायींची सुटका केली असून वाहनासह एकूण २ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील नेरी बुद्रुक गावाजवळील बालाजी पेट्रोल पंप परिसरात एक संशयित बोलेरो पिकअप (एमएच ०४ एचवाय २६४४) थांबलेला होता. या वाहनात गोवंश जातीची जनावरे असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तपासणी केली. वाहनाची तपासणी केली असता, त्यात ३ बैल आणि २ रेड्या जातीच्या गो-ऱ्हे (एकूण ५ जनावरे) अत्यंत निर्दयीपणे कोंबलेले आढळले. जनावरांच्या मानेला आणि पायाला दोरीने घट्ट बांधून त्यांना हालचालही करता येणार नाही अशा स्थितीत ठेवण्यात आले होते. त्यांच्यासाठी चारा किंवा पाण्याची कोणतीही सोय करण्यात आली नव्हती. फिर्यादी खुशाल दिलीप कुमावत (वय २३, रा. नेरी बु.) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ही जनावरे कत्तलीसाठी नेली जात होती. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी शेख सलीम शेख चांद (वय २६, रा. पाचोरा) याच्याविरुद्ध जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.




