जळगाव, प्रतिनिधी | सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. या दिनानिमित्त समाजात एकात्मता वाढीस लागावी. या उद्देशाने जळगाव जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग, गृहरक्षक दल, जिल्हा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव रनर्स ग्रुप व महानगर पालिकेच्या वतीने ‘रन फॉर युनिटी’चे आयोजन करण्यात आले आहे.
या राष्ट्रीय एकात्मता दौडमध्ये जिल्ह्यातील विविध स्वयंसेवी संस्था, व्यापारी असोसिएशन, क्रीडा संघटना, खेळाडू तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदवावा. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ‘एकता दौड’च्या (Run For Unity ) पूर्वतयारी बैठकीत केले.
या बैठकीस जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन. पाटील, प्र.निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षीत, सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.यु.बी. तासखेडकर, जळगाव रनर्स ग्रुपचे डॉ.विवेक पाटील, डॉ.उमेश पाटील, डॉ.प्रशांत देशमुख, समाजकार्य महाविद्यालय, चोपडा येथील डॉ. प्रा.मोहिनी उपासनी, तहसिलदार वैशाली हिंगे, तहसिलदार प्रशांत कुलकर्णी, मनपाचे उपायुक्त मिनिनाथ दंडवते, पोलीस निरीक्षक सर्वश्री गोरक्ष शिरसाठ, युनुसखान पठाण, बापू रोहम तसेच मनपा, गृहरक्षक दल, पोलीस विभाग आणि जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थित होते.
राष्ट्रीय एकात्मतेसाठी आयोजित या दौडच्या अगोदर सकाळी ६.०० ते ६.३० वाजेदरम्यान खान्देश मॉल येथे जळगाव रनर्स ग्रुपतर्फे दौडमध्ये सर्व सहभागी व्यक्तींसाठी योगाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सकाळी ६.३० वाजता पोलीस बँडसह सर्वजण दौडमध्ये सहभागी सामील होतील, खान्देश मॉल येथून एकता दौड सुरू होईल. शहरातील नेहरू चौक-टॉवर चौक-चित्रा चौक-नेरीनाकामार्गे स्वातंत्र्य चौक आणि तेथून बसस्टँड समोरून जावून खान्देश मॉल येथे दौडची सांगता होईल.
एकता दौड दरम्यान राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यासाठी सालाबादप्रमाणे यंदाही सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर रोजी ‘रन फॉर युनिटी’चे आयोजन करण्यात आले आहे. प्रशासनातर्फे ‘रन फॉर युनिटी’मध्ये सर्व सहभागींसाठी टी शर्ट पुरविण्यात येणार असून टी शर्ट परिधान करून रनर्स या दौडमध्ये धावणार आहेत. या दौडमध्ये शासकीय अधिकारी, खेळाडू, विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी, जळगाव रनर्स ग्रुपचे पदाधिकारी, प्रतिनिधी सोबतच विविध स्वयंसेवी संघटना, व्यापारी असोसिएशन, डॉक्टर्स, युवक, युवती तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी केले आहे.