रावेर (प्रतिनिधी) शहरात चोऱ्यांचे सत्र थांबता थांबत नाहीय. गुरुवारी रात्री पुन्हा जयेश नगरमधील एका घर चोरट्यांनी फोडले. यामध्ये दागिने व ५ हजारच्या रोख रकमेसह एकूण एक लाखाचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले आहेत. शहरातील वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत माहिती अशी की, शहरातील जयेश कॉलनीमधील रहिवाशी पं.स.कर्मचारी शकील मुबारक तडवी यांच्या घरात अज्ञात चोरट्यानी गुरुवारी रात्री खिडकीचे ग्रील तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील ४५ हजार रुपये किंमतीचा १५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार, ६ ग्रॅम वजनाचे १८ हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी , १२ हजाराचे कानातले दागिने, ९ हजाराची सोन्याची पोत, ६ हजार किंमतीचे कानातले लहान दागिने , चांदीच्या पट्ट्या, ५ हजार व ५ हजाराची रोख रक्कम असा एकूण एक लाखाचा ऐवज लंपास केल्या आहेत. त्यानंतर चोरट्यांनी केळी बागेचा सहारा घेत पोबारा केला.
विशेष म्हणजे चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी शकील तडवी याच्या घरात मागील बाजूस असलेल्या केळीबागे जवळ येऊन तारेचा कंपाउंड ओलांडून लोखंडी खिडकीचे लाकडी दांडक्याने गिरील तोडून आत प्रवेश केला. त्या खिडकीतून लहान मुलगा जाईल फक्त इतकी जागा असल्याचे दिसून आले. तसेच चोरी झालेल्यांच्या ठिकाणी व शेजारील लोकांच्या घराच्या मागील बाजूस केळीबाग असून तारेची जाळीचा कंपाउंड लावले आहे. दरम्यान, पुढील तपास पो.नि. रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस कर्मचारी करीत आहेत.