बुलढाणा-वृत्तसेवा | गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी अडचणीत असल्याच्या अफवा समाजमाध्यमांवर आणि काही भागांत पसरवण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी स्वतः समोर येत या सर्व चर्चांचा ठाम शब्दांत इन्कार केला असून, संस्थेची आर्थिक स्थिती अत्यंत भक्कम व सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे. मराठवाड्यात पसरलेल्या अफवांमुळे काही ठिकाणी ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बीड, वडवणी यांसारख्या भागांत पहाटेपासून नागरिकांनी आपल्या ठेवी काढण्यासाठी बँकांबाहेर गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. याआधी काही सहकारी पतसंस्थांमध्ये ठेवीदारांचे नुकसान झाल्याच्या घटनांमुळे ही भीती अधिक तीव्र झाल्याचे दिसून आले.

या संदर्भात बोलताना राधेश्याम चांडक यांनी सांगितले की, बुलढाणा अर्बन ही आशिया खंडातील आघाडीच्या सहकारी पतसंस्थांपैकी एक असून सध्या संस्थेकडे सुमारे १६ हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. यासोबतच जवळपास ४ हजार कोटी रुपयांची मालमत्ता आणि सुमारे ५ हजार कोटी रुपयांचे सोने पूर्णतः सुरक्षित स्वरूपात उपलब्ध आहे. त्यामुळे संस्थेच्या आर्थिक स्थैर्यावर कोणताही प्रश्न उपस्थित होऊ शकत नाही, असे त्यांनी ठामपणे नमूद केले.

अफवांच्या मागील कारणांचा उल्लेख करताना चांडक यांनी सांगितले की, कर्नाटकातील एका साखर कारखान्याला कर्ज देण्यास नकार दिल्यानंतर काही हितसंबंधी घटकांकडून मुद्दाम संस्थेची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ठेवीदारांमध्ये भीती निर्माण करून संस्थेच्या विश्वासार्हतेला धक्का देणे हाच या अफवांचा मुख्य उद्देश असल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, बुलढाणा अर्बनच्या सर्व शाखांमधील व्यवहार पूर्णपणे सुरळीत सुरू असून कोणतीही अडचण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. बँक प्रशासनाकडून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता शांत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संस्थेचा दीर्घकालीन अनुभव, काटेकोर आर्थिक नियोजन आणि मजबूत मालमत्ता यामुळे अशा अफवांचा कोणताही परिणाम होणार नसल्याचा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.



