Home क्राईम हळदीच्या कार्यक्रमात राडा : बँडमालकाला धारदार शस्त्राने वार

हळदीच्या कार्यक्रमात राडा : बँडमालकाला धारदार शस्त्राने वार


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । हळदीच्या कार्यक्रमात आनंदाच्या वातावरणाला गालबोट लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाजंत्री वाजविण्याची वेळ संपल्याने बँड पुन्हा सुरू करण्यास नकार दिला म्हणून नवरदेवासह त्याच्या दोन-तीन साथीदारांनी बँडमालकाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना २१ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास मेहरुण परिसरातील रामनगर भागात घडली.

अशी आहे घटना :
शिरसोली येथील रहिवासी असलेले बँडमालक अमोल लक्ष्मीकांत पवार (वय २६) यांची वाजंत्री मेहरुणमधील शंकर अशोक काळे यांच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी लावण्यात आली होती. रात्री १० वाजल्याने शासकीय नियमानुसार त्यांनी वाजंत्री वाजविणे बंद केले. मात्र, नवरदेव शंकर काळे याने आपल्याला अजून नाचायचे असून पुन्हा बँड सुरू कर, असा तगादा लावला. वेळ संपल्याचे सांगत अमोल पवार यांनी बँड सुरू करण्यास स्पष्ट नकार दिला.

धारदार वस्तूने केला हल्ला :
बँडमालकाच्या नकाराचा राग आल्याने नवरदेव आणि त्याच्यासोबत असलेल्या २ ते ३ जणांनी शिवीगाळ करत वाद घालण्यास सुरुवात केली. वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले आणि त्यातील एकाने धारदार वस्तूने अमोल पवार यांच्या डोक्यात वार केला. “जर बँड वाजविला नाही, तर तुला सोडणार नाही,” अशी जीवे मारण्याची धमकीही यावेळी नवरदेवाच्या मंडळींनी दिली.

पोलिसात गुन्हा दाखल :
या हल्ल्यात जखमी झालेल्या अमोल पवार यांनी २२ फेब्रुवारी रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यावरून नवरदेव शंकर काळे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक पंकज पाटील करत आहेत.


Protected Content

Play sound